फेरीत सहभागी झाल्याने मराठी व्यावसायिकांना केले लक्ष्य
कन्नड संघटनांकडून अरेरावी, म. ए. समितीचे कार्यकर्ते दाखल
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
काळ्यादिनाच्या फेरीमध्ये सहभागी झाल्याचा द्वेषातून मराठी व्यावसायिकांना त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी अनगोळ येथील एका हॉटेल व्यावसायिकाला कन्नड संघटना, तसेच महानगरपालिकेकडून फोन करून लक्ष्य करण्यात आले. काही संघटनांनी थेट हॉटेलवर चाल करण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये काढण्यात आलेल्या काळ्यादिनाच्या फेरीमध्ये हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले. फेरीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने आता कन्नड संघटना बिथरल्या आहेत. फेरीमध्ये सहभागी झालेल्या व माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या व्यावसायिकांना लक्ष्य केले जात आहे.
अनगोळ-उद्यमबाग रोडवरील हॉटेल विराटचे संचालक कपिल भोसले यांना सोमवारी सकाळपासून कन्नड संघटनांच्या म्होरक्यांचे फोन येण्यास सुरुवात झाली. ‘तुम्ही फेरीत का सहभागी झाला?’ असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचबरोबर मनपाच्या काही कर्मचाऱ्यांनीही त्यांना फोन करून हॉटेलचा फलक व इतर माहिती विचारून घेतली.
काही संघटना हॉटेल परिसरात येऊन गोंधळ घालणार असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उद्यमबाग परिसरात दाखल झाले. रमाकांत कोंडुसकर, अंकुश केसरकर, सागर पाटील, गणेश द•ाrकर, सुनील बोकडे, किरण हुद्दार, शेखर तळवार, प्रवीण रेडेकर, सूरज चव्हाण, गजानन बैलूरकर यांसह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत कपिल भोसले यांना पाठिंबा दर्शविला. असे प्रकार शहरात वारंवार होत असून पोलिसांनी यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा शहरात पुन्हा एकदा भाषिकवाद उफाळण्याची शक्यता आहे.
