मराठा युवक संघाच्या आंतर शालेय-विद्यापीठ जलतरण स्पर्धां 24 पासून
बेळगाव : मराठा युवक संघ आयोजित आबा स्पोर्ट्स क्लब व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ मराठा युवक संघाच्या 19 व्या भव्य आंतरशालेय व आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्याचे मराठा युवक संघाच्या बैठकीत एकमताने ठरले. या स्पर्धा दिनांक 24 व 25 ऑगस्ट रोजी हिंद सोशल स्पोर्ट्स क्लबच्या हिंदवाडी येथील जलतरण तलावात करण्याचे एकमुमाने ठरले. या बैठकीत मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी हा प्रस्ताव मांडला व सर्वांनी याला मंजुरी दिली. यावेळी बाळासाहेबांनी या स्पर्धा यंदा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यासाठी दोन दिवसांची तसेच महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथील जलतरणपटूना निमंत्रण देण्याचे सुचविले.
यावेळी मराठा युवक संघाचे पदाधिकारी रघुनाथ बांडगी, चंद्रकांत गुंदकल, नारायण किटवाडकर, सुहास किल्लेकर, शेखर हंडे आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलभत्ते जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार हे उपस्थित होते. या स्पर्धा शनिवार दिनांक 24 रोजी दुपारी दोन वाजता सुरू होऊन रविवार दिनांक 25 रोजी दुपारी 2 पर्यंत चालू राहतील असे मराठा युवक संघाचे सेक्रेटरी चंद्रकांत गुंदकल यांनी कळविले आहे. बेळगाव येथील सर्व शाळेच्या जलतरणपटूंनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन सुहास किल्लेकर यांनी केले आहे. विशेष माहितीसाठी जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार कार्पोरेशन जलतरण तलाव गोवावेस यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात येते.