Maratha Reservation: आंदोलनासाठी जमा केलेला धान्यसाठा वाड्यावस्त्या अन् आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी ही मदत मोलाची ठरणार आहे
By : महेश तिरवडे
राधानगरी : गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या पुढाकारातून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना मदतीसाठी तायशेटे यांनी दिलेला २६ पोती तांदूळ आणि ७ बॉक्स बिस्किटे, फेजीवडे येथील मुस्लिम बांधवांनी दिलेले २०० किलो तांदूळ याचे आता वाड्यावस्त्यांवरील शाळा व ज्यांना अनुदान मिळत नाही त्या आश्रमशाळां व अनाथआश्रम यांना वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही मदत येत्या दोन दिवसांत संबंधित शाळा आणि आश्रमशाळांमध्ये पोहोचवली जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी ही मदत मोलाची ठरणार आहे. या उपक्रमामध्ये सामाजिक ऐक्याचे आणि बांधिलकीचे दर्शन घडले आहे.
आंदोलनासाठी जमलेली संसाधने केवळ आंदोलनापुरत्या मर्यादित न ठेवता, गरजू विद्यार्थ्यांच्या हितासाठी वळवणे, ही समाजातील जागरूकतेची आणि उत्तरदायित्त्वाची निशाणी मानली जात आहे. अभिजित तायशेटे, फेजीवडे येथील मुस्लिम समाज यांच्यासह सहभागी सर्व दात्यांचे व संयोजकांचे या उपक्रमासाठी विशेष कौतुक होत आहे.