मराठा मंडळ सुरू करणार ‘इंडस्ट्री इन कॅम्पस’
बेळगाव : मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज ‘इंडस्ट्री इन कॅम्पस’ ही संकल्पना घेऊन अभिनव उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत मराठा मंडळ येथे मध्यम व सुक्ष्म उद्योग (मायक्रो अँड टायनी) सुरू करण्यासाठी कारखानदार किंवा उद्योजकांना आमंत्रित करण्यात येत आहे. याचा लाभ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना होणार असून कॅम्पसमध्येच त्यांना कौशल्याचे प्रशिक्षण मिळणार आहे, अशी माहिती मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर-नागराजू यांनी दिली. मंगळवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, जर्मनीमध्ये व पाश्चात्य देशात इंडस्ट्री इन कॅम्पस ही संकल्पना यशस्वी झाली आहे. मराठा मंडळ इंजिनिअरिंगकडे 22 एकर जागा असून इंडस्ट्री इन कॅम्पससाठी आम्ही चार एकर जागा देणार आहे. सरकार ज्या उद्योगांना प्रोत्साहन देत आहे, अशा उद्योगांसाठी आमच्या कॅम्पसमध्ये स्टार्टअप सुरू करता येईल. जेणेकरून जागा, संरचना, तंत्रज्ञानाच्या सवलती, कार्यालय व अन्य सुविधा यांच्या अभावामुळे ज्यांना उद्योग करणे शक्य नाही त्यांना उद्योग सुरू करता येईल व याचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांनाही होईल.
या स्टार्टअपमुळे उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल. तसेच उद्योजकांना विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल लेक्चर्सचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, प्रकल्पासाठी प्रोत्साहन देणे, उद्योजकता व शैक्षणिक अभ्यास यांच्यात देवाण-घेवाण करणे, कौशल्य विकासासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करणे, टेक्निकल हॅकेथॉन सुरू करणे, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रायोजकत्व स्वीकारणे व गरजू विद्यार्थिनींना अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी मदत करणे साध्य होणार आहे, असे संचालक डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. या अनुषंगाने येत्या 7 फेब्रुवारीला खास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीबीटीच्या सचिव डॉ. एकरुप कौर, एसीई डिझाईनर्सचे सीईओ एल. एस. उमेश, कार्यकारी मंडळाचे सदस्य व विधानपरिषद सदस्य नागराजू यादव, एसीईएचे सहसंचालक मुरलीधर राव, बीडीएसएसआयएचे अध्यक्ष श्रीधर उप्पीन, उपाध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, तरुण उद्योजक आनंद देसाई आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी नागराजू यादव असतील, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी संचालक रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मणराव सैनूचे, दिनकर ओऊळकर आदी उपस्थित होते.