ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराविरोधात मराठा महासंघ आक्रमक
७ ऑक्टोबरला पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा
सावंतवाडी । प्रतिनिधी
मुंबई- गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे तेथील मिडलकट कडून दुचाकी क्रॉसिंग करताना कारची जोराची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता . यावेळी संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग बंद केला.तसेच तेथे माजी आमदार वैभव नाईक आले होते. सायंकाळी महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांनी जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी वैभव नाईक यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार श्री नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाला असून येत्या ७ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून महामार्गाचे कनिष्ठ कार्यकारी अभियंता मुकेश साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार आहे.ॲट्रॉसिटी कायदा हा दलित, वंचित समाजासाठी बनवण्यात आला आहे. हा कायदा सरकारी अधिकाऱ्यांना व्यक्तिशः संरक्षण देण्यासाठी नाही .ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैर वापराने सार्वजनिक जबाबदारी धोक्यात आली आहे.त्यामुळे ॲट्रॉसिटी खटला निकाली काढेपर्यंत कनिष्ठ अभियंता साळुंखे यांचे तात्पुरते निलंबन करण्यात यावे. माजी आमदार वैभव नाईक या खटल्यात निर्दोष सिद्ध झाल्यास, ॲट्रॉसिटी कायदा दुरुपयोगासाठी श्री साळुंखे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे करण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी केले आहे.