मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे ‘मराठा दिन’ साजरा
हुतात्मा जवानांना मानवंदना; आकर्षक-शिस्तबद्ध पथसंचलन
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे बुधवार दि. 4 रोजी मराठा दिन अत्यंत गौरवपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. प्रारंभी, मराठा दिनानिमित्त सकाळी शरकत युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा जवानांना मानवंदना देण्यात आली. या समारंभाचे नेतृत्व कमांडंटनी केले. यावेळी अधिकारी, जेसीओ, जवान तसेच माजी सैनिक उपस्थित होते. या प्रसंगी देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या स्मृतींना उजाळा देत रेजिमेंटच्या शौर्य, त्याग आणि कर्तव्य भावनेची परंपरा अधोरेखित करण्यात आली. या कार्यक्रमाला कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, तसेच मृणालिनी मुखर्जी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी वरिष्ठ अधिकारी, नागरिक, माजी सैनिक, जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये शिस्त, पराक्रम आणि योद्धा वृत्तीचे दर्शन घडविणारे मार्शल आर्ट्सचे सादरीकरण झाले. त्यानंतर भारताच्या समृद्ध, सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक संगीत कार्यक्रम सादर झाला. यामध्ये सहभागी कलाकारांचा सन्मान करण्यात आला. मराठा दिनाच्या अनुषंगाने ‘एक्सरसाईज पहला कदम’ ही प्रशिक्षण मोहीम तुर्कमट्टी येथे अग्निवीर जवानांसाठी राबविण्यात आली. 2 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 547 अग्निवीर, तर 5 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 543 अग्निवीरांनी या मोहिमेत सहभाग घेतला. तुर्कमट्टी संरक्षण भूमीपासून रेजिमेंटल सेंटरपर्यंत काढण्यात आलेल्या शिस्तबद्ध पथसंचलनाने सहनशक्ती, बांधिलकी आणि परंपरेचा सुरेख संगम अधोरेखित केला.