मराठा समाजाने जनगणनेमध्ये उपजात ‘कुणबी’ची नोंद करावी
विधानपरिषद सदस्य मारुती मुळे यांची पत्रकार परिषदेत माहिती : शहरासह ग्रामीण भागात करणार जागृती
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून जातनिहाय जनगणना 22 सप्टेंबरपासून केली जाणार आहे. राज्यात 40 लाखांहून अधिक मराठा समाजबांधव असूनदेखील सरकारदरबारी अतिशय कमी नोंद आहे. त्यामुळे यावेळी सर्वांनी जनगणना करताना धर्म हिंदू, जात मराठा, उपजात कुणबी व मातृभाषा मराठी असा उल्लेख करावा, असे आवाहन विधान परिषद सदस्य व मराठा समाज डेव्हल्पमेंट कार्पोरेशनचे माजी चेअरमन मारुतीराव मुळे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. यावेळी प्रत्येक कुटुंबाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व जातनिहाय पद्धतीने जनगणना होणार आहे. मराठा समाजाला आरक्षणासह इतर सुविधा मिळविण्यासाठी योग्यरितीने जनगणना होणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठा समाजाने जनगणनेवेळी योग्यप्रकारे आपली जात, उपजात व मातृभाषेची नोंदणी करावी. यामुळे भविष्यात सरकारकडून मराठा समाजाला सोयी-सुविधा उपलब्ध करून घेण्यास मदत होणार आहे.
जातनिहाय नोंदणीनंतर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाबाबत सरकारला विचार करावा लागेल. राज्यात 40 लाख मराठा समाजबांधव असताना सरकारदरबारी मात्र 20 लाख नोंदणी आहे. त्यामुळे यावेळेला योग्यप्रकारे नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक गावागावात जनगणनेसाठी मराठा समाजाने जागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनचे अध्यक्ष शामसुंदर गायकवाड, सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव, धनंजय जाधव, रमेश गोरल, युवराज कदम, शरद पाटील, वैभव कदम, मराठा एकल संघाचे नारायण झंगरुचे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘कुणबी’ म्हणजे ‘शेतकरी कष्टकरी’
मराठा समाजाने आपली उपजात ‘कुणबी’ अशी करावी, असे मराठा समाजाने स्पष्ट केले आहे. परंतु ‘कुणबी’ या शब्दाबाबत अद्याप ग्रामीण भागात म्हणावी तशी माहिती नव्हती. ‘कुणबी’ म्हणजे ‘शेतकरी कष्टकरी’. बेंगळूर येथे झालेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात अनेक तज्ञांशी चर्चा करून ‘उपजात कुणबी’ असा उल्लेख करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाने आपल्या उपजातीमध्ये कुणबी असा उल्लेख करावा, असे एम. जी. मुळे यांनी सांगितले.