माडखोल गावात आरक्षणासाठी मराठा समाज बांधव एकवटले
एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात उत्स्फूर्त सहभाग
ओटवणे | प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी माडखोल गावातील सकल मराठा समाज बांधव एकवटले. माडखोल फणस बसस्टॉप येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले असुन या एक दिवशी लाक्षणिक उपोषणात माडखोल गावातील मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.
सुरुवातीला शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या लाक्षणिक उपोषणाची सुरुवात करण्यात आली. या लाक्षणिक उपोषणात 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', 'कोण सांगतोय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही', 'जरांगे पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है', 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. मराठा आरक्षणासाठी झालेला हा उठाव प्रेरणादायी असुन असा उठाव आता खेडोपाड्यातून होणे ही काळाची गरज आहे. हे लाक्षणिक उपोषण इतर गावांना प्रेरणा देईल.
मराठा आरक्षणासाठी आता गावागावातून उठाव होणे ही काळाची गरज आहे. गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा स्थापन करुन एकजूट अभेद्य ठेवण्यात येणार आहे. तसेच कुडाळ येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या लाक्षणिक उपोषणात माडखोल गावातील मराठा समाज बांधव आपले राजकीय व वैयक्तिक मत व मनभेद बाजूला ठेवून फक्त मराठा जात म्हणून एकत्र येऊन विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली.