मराठा समाजाचा आज सर्वपक्षीय भव्य मेळावा
प्रतिनिधी/ बेळगाव
सकल मराठा समाज बेळगावच्यावतीने रविवार दि. 21 रोजी भव्य सर्वपक्षीय मराठा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता रेल्वेओव्हरब्रीजजवळील मराठा मंदिर येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये जनगणनेमध्ये मराठा समाजाने नोंदणी करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा, तसेच मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली जाणार आहे.
22 सप्टेंबरपासून राज्य सरकारकडून जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. या जनगणनेद्वारे राज्यातील मराठा समाजाची संख्या मिळणार आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाने नोंदणी करताना जात मराठा, उपजात कुणबी, मातृभाषा मराठी असा उल्लेख करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार अधिकाधिक जागृती करण्यासाठी मराठा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी होणाऱ्या मेळाव्यामध्ये सर्व पक्षांमध्ये असलेले मराठा बांधव एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मराठा समाजाचा उद्धार व्हावा, त्याचबरोबर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक आरक्षण मिळावे या उद्देशाने मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.