म्हापसा दोराडा : दोन बांगलादेशींना अटक
बंगलूर येथे बांगलादेशींच्या वस्तीतून आवळल्या मुसक्या : त्यांच्याच घरात चार बांगलादेशींनी मिळून शिजवला कट
म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथे 7 ऑक्टोबर रोजी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोघा दरोडेखोरांना पकडण्यात अखेर राज्य पोलिसांना काल मंगळवारी यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या या दोघांच्या घरात म्हापशातील दरोड्याचे नियोजन करण्यात आले होते. हे दोघेही मुख्य संशयित नसून अन्य चारजण मुख्य संशयित असून त्यांनीच दरोड्याचा कट रचला होता, असे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झालेले आहे. गोवा पोलिसांनी कर्नाटकात गेले काही दिवस चालविलेल्या शोधमोहिमेत बेंगलूर येथे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळले. तेथूनच या दरोडा प्रकरणातील अन्य चार दरोडेखोर बांगलादेशात पोहोचले आहेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजू बाबू बीन (वय 27, राहणारा बेंगलूर कर्नाटक) सफीकूल रोहुली आमीर (वय 37 राहणारा बेंगलूर कर्नाटक) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही बंगलादेशी आहेत. त्यांचे बेंगलूरात वास्तव्य होते. मुख्य दरोडेखोरांना दरोड्याचे नियोजन करण्यास आणि दरोड्यानंतर पलायन करण्यास या दोघांनी मदत केली होती. या दरोड्यात सहाजण सहभागी होते, पैकी या दोघांना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले असल्याची माहिती देण्यात आली. गणेशपुरी म्हापसा येथे राहत असलेल्या प्रसिद्ध डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यात अज्ञात सहा बुरखाधारी इसमांनी 7 ऑक्टोबर रोजी हा सशस्त्र दरोडा घातला होता. दरोड्यात सुमारे 10 लाखाची रोख, सोन्याचे दागिने मिळून 50 लाखांचा ऐवज पळविला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळू नये म्हणून घरातील सर्वांचे भ्रमणध्वनी संच तसेच सीसीटीव्ही डीव्हीडी कॅमेराही दरोडेखोरांनी पळताना आपल्या सोबत नेला आहे. इतकेच नव्हे तर डॉक्टरांच्या कारची चावी जबरदस्तीने घेऊन त्याच कारने पळ काढला होता.
त्याच दिवशी नाकाबंदी केली असती तर...
डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यात दरोडा घातल्यानंतर सकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी दरोडेखोर पसार झाले होते. या घटनेची माहिती त्वरित म्हापसा पोलिसांना देण्यात आली होती. त्याचवेळी जर राज्याच्या सीमा बंद करुन कडक तपासणी केली असती तर दरोडेखोर गोव्याबाहेर जाऊच शकले नसते. त्यामुळे पोलिसांचे हे सपशेल अपयश असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जर नाकाबंदी केली असती तर सर्व दरोडेखोर त्याच दिवशी पोलिसांच्या तावडीत सापडले असते, असे मत म्हापशातील नारिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक हे आयपीएस अधिकारी असतात, मग त्या पदाचा उपयोग काय? प्रश्न उपस्थित करुन या अधिकाऱ्यांच्या हुशारीचा काहीच फायदा होत नाही, अशी टीकाही होत आहे.
एवढा मोठा दरोडा घातल्यानंतर त्यांना पडकण्यासाठी प्रथम सीमांवर नाकाबंदी करायला हवी, ही प्राथमिक गोष्टही पोलिसांना कळत नाही काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरोडेखोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले, अशीही प्रतिक्रिया उमटली आहे. दरोडेखोर राज्यातील सीमेवरुन दागिने व रोख घेऊन पळाले, यावरून सीमांवरील चेकनाक्यांवर योग्यरित्या तपासणी केली जात नाही, हे स्पष्ट होते. राज्याच्या सीमेवर त्याच दिवशी नाकाबंदी केली असती, आणि तेथील अधिकाऱ्यांनी कसून तपास केला असता, तर सहाहीजण त्याच दिवशी सापडले असते. मात्र पोलिसांनी तसे न केल्याने या दरोड्याचा तपास रेंगाळलेला आहे.