मान्याचीवाडीचा दिल्लीत सन्मान
सातारा :
दिल्ली येथे गरीबी मुक्त गाव, आरोग्य दायीगाव, बाल स्नेही गाव आदी उपक्रमासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील गावांना दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ग्रामऊर्जा स्वराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचा स्वीकार सरपंच रवींद्र माने यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत घेतला. या पुरस्कारामुळे सातारा जिल्हा परिषदेचा दिल्ली दरबारी पुन्हा एकदा डंका वाजला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने यापूर्वी स्वच्छतेमध्ये दिल्ली दरबारी पुरस्कार पटकावलेला आहे. त्याचबरोबर इतर पुरस्कारही पटकावलेले आहेत. असे असताना जिल्हा परिषदेच्या वतीने जिह्यात सौर ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सौर ग्राम हा उपक्रम राबवण्यात पाटण तालुक्यामधील मान्याचीवाडी हे गाव अग्रेसर ठरले. ज्या गावाने यापूर्वी स्वच्छतेमध्ये आजअखेर दबदबा कायम राखला आहे. ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्काराचे घोषणा होताच या गावांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष झाला होता.
या पुरस्काराच्या यशस्वीतेसाठी गावच्या ग्रामस्थांबरोबरच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अभियंता अमर साबळे, पाटणचे गटविकास अधिकारी यांचेही योगदान आहे.