कित्येक वैष्णवी न्यायाच्या प्रतिक्षेत !
शिक्षण आणि संस्कार या दोन भिन्न गोष्टी आहेत. माणसाकडे शिक्षण असले म्हणजेच संस्कार आहेत असे नाही. तसेच संस्कार आहेत म्हणजे शिक्षण आहे असे देखील नाही. शिक्षण आणि संस्कार यांचा मिलाप खूप कमी आहे. याच शिक्षण आणि संस्कारात दडलेली आहे हुंडा प्रथा. आजही शिकलेली आणि संस्कारी लोकं देखिल खुलेआम हुंडा घेत आहेत. जिथे हुंडा दिला जात नाही तिथे छळवाद सुऊ आहे. या छळवादात अनेक वैष्णवींचा बळी जात असल्याने, त्या अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
मुलगी म्हणजे घरातील लक्ष्मी...मुलगी म्हणजे बापाचा जीव की प्राण..अगदी तळहाताच्या फोडासारखी जपलेली मुलगी ज्यावेळेस लग्न कऊन परक्याच्या घरी जायला निघते त्यावेळेस हमसून-हमसून रडणारा बाप सर्वांनीच पाहिला आहे. बाहेर वाघासारखा डरकाळ्या फोडणारा बाप हा मुलीसमोर तिच्या प्रेमापोटी गरीब गाय देखील बनायला तयार असतो. अगदी त्याच मुलीचा डोळ्dयासमोर छळ होताना पाहत असताना या बापाच्या मनात काय घालमेल होत असेल हे शब्दात व्यक्त करता येत नाही. तर याच छळापोटी हसत्या-खेळत्या मुलीने स्वत:चे आयुष्य संपविले तर या बापाचे दु:ख काय असते हे कोणालाच समजणार नाही. चार पैशांसाठी आपल्या पत्नी, सुन, भावजयीची हत्या करणाऱ्या नराधमांची ताकद वाढत चालली आहे. यामुळे कित्येक सासरवाशीण मुलींनी या हुंड्याच्या छळापोटी आपला जीव दिला आहे. यातीलच ज्वलंत उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणे या माऊलीचे. सासरच्या त्रासाला कंटाळून या बाळंतीणीने आपला जीव देत आयुष्य संपविले. मात्र याचे काही सोयरसुतक तिच्या सासरच्या मंडळांना नाही. राज्यात हीच केवळ वैष्णवी नाही तर अशा अनेक वैष्णवी सासरच्या छळाला बळी पडत चालल्या आहेत. यामुळे अद्यापही कित्येक वैष्णवी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
पैशांच्या हव्यासापोटी आपल्या सुनेचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबासाठी नराधम आणि माणुसकीला कलंक ही दोन विशेषणं अगदी परफेक्ट सूट करतात. घरात अमाप काळा पैसा ते ही दुसऱ्याला धमकाऊन गोळा केलेली माया असूनही आपली सून वैष्णवीला मारझोड करणारे हे हगवणे मुळशी तालुक्यातील प्रचंड माजलेले घराणे आहे. आपल्या संपत्तीचे आणि ताकदीचे प्रदर्शन करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. यासाठी त्यांनी अनेक गावगुंडे पाळलेली आहेत. हुंड्याच्या हव्यासापोटी आपल्या नक्षत्रासारख्या सुनेचा जीव घेणाऱ्या हैवान हगवणेंचे कारनामे ऐकाल तर चक्रावून जाल. पैशाच्या मस्तीत आणि सत्तेच्या कैफात हे हगवणे इतके धुंद झाले होते की ते स्वत:ही माणसे आहेत हे विसऊन गेले. दोन्ही सुनांचा त्यांनी अतोनात छळ केला. या हगवणेंच्या अख्ख्या खानदानाला आपल्या पैशांचा इतका माज होता की आपल्या संपत्तीचं ते ओंगळवाणं प्रदर्शन एवढे मांडायचे की आपल्या घरातल्या बैलासमोर या हगवणेंनी चक्क गौतमी पाटीलला नाचविल्याची घटना ताजी आहे. 2004 साली राष्ट्रावादीच्या तिकीटावर त्यांनी मुळशी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली. मात्र या निवडणुकीत त्यावेळेच्या शिवसेनेच्या शरद ढमलेंनी त्यांचा पराभव केलेला. ‘गिरे तो भी टांग उपर’ या उक्तीप्रमाणे आमदारकीला पराभूत होऊनही त्यांनी आपल्या राजकीय ओळखींच्या जोरावर मुळशी पट्ट्यात आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला. आपल्या राजकीय ताकदीच्या आणि ओळखींच्या जोरावर त्यांचा लोकांना धमकवण्य़ाचा धंदा खुलेआम सुऊ असायचा. पैशांच्या जोरावर घमेंड दाखवणाऱ्या हगवणे कुटुंबाचे उत्पन्नाचं प्रमुख साधन म्हणजे जमिनींचे प्लॉट पाडून विकणे. पण त्यांना पैशांची हाव इतकी मोठी झालेली की त्यांनी आपल्या सुनांना पैशांसाठी छळण्याचा धंदाही सुऊ केला.
पैशांसाठी हपापलेले आणि आपल्याच घरातल्या सुनांचा सन्मान न ठेवणारे हगवणेंसारखे लोक समाजासाठीच मोठा कलंक आहेत. आणि असे कलंक कायमस्वऊपी मिटवण्यासाठी हगवणेंच्या सगळ्या कुटुंबाला कठोरातली कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. वैष्णवीच्या घरच्यांनी अगदी शाही पद्धतीने मुलीचे लग्न करून दिले होते. लग्नात लाखांचा खर्च केला होता. वैष्णवीच्या घरच्यांनी तिला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न कऊन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न कऊन दिलं, अशी माहिती एफआयआरमधून समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धऊन सून वैष्णवीस घालून पाडून बोलण्यास सुऊवात केली. एवढेच नाही तर तिच्या चारित्र्यावर संशय घेत सासू लता, नणंद करीश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास देणे सुरू केले. तसेच पती शशांक याने वैष्णवीला तिच्या माहेरच्यांकडून जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी ऊपयांची मागणी केली होती. याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितले असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. वैष्णवीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र सासरच्या भीतीने तिच्या मनात एवढे घर केले होते की, झोपलेली वैष्णवी दचकुन जागी होत असे. याच भीतीपोटी तिने गळफास घेत स्वत:चं आयुष्य संपविले. तर या घटनेमुळे घाबरलेले अख्खे हगवणे कुटुंब फरार झाले. मात्र कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पोलिसांना आदेश देताच हगवणे कुटुंबातील सदस्यांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेची दखल प्रथम राज्य महिला आयोगाने घेणे क्रमप्राप्त होते. मात्र महिला आयोगाने यावेळी बोटचेपे धोरण घेतल्याचे आढळून आले. राज्यात अशा अनेक वैष्णवींचा बळी जात आहे. मात्र हुंडाबळीच्या तक्रारीबाबत राज्य महिला आयोग उदासीन असल्याचे चित्र आढळून येते.
राज्यात महिलांविरोधातील हिंसाचार, शोषण, छेड, अत्याचारांशी संबंधित घटना आयोगाच्या निदर्शनास येताच, योग्य तपास आणि गुन्हेगारांवर कारवाईसाठी संबंधित सरकारी तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने त्वरित पावले उचलली जातात. यामध्ये वैवाहिक संबंध, मालमत्तेच्या बाबी, हुंड्यासाठी छळ, हुंडाबळी, बलात्कार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ इत्यादींच्या तक्रारी आयोगाच्या कार्यालयात नोंदविण्यात येतात. राज्य महिला आयोगाकडे, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या काळात 13 हजार 738 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
शिवाय, मागील वर्षीच्या एक हजार 701 तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामुळे आयोगाकडे एकूण 15 हजार 439 तक्रारी आहेत. महिला आयोगाच्या या प्राप्त तक्रारींवर नजर टाकली असता गेल्या वर्षभरात किंवा मागील प्रलंबित तक्रारींमध्ये हुंडाबळीची एकही तक्रार आयोगाकडे नोंदविण्यात आलेली नाही. त्याशिवाय न्यायालनीय प्रलंबित दाव्याचीही एकही तक्रार आयोगाकडे नोंदविण्यात आलेली नाही. यंदाही ही प्रथा तशीच कायम असून हुंडाबळी आणि न्यायालीन प्रलंबित दावा यासंदर्भात आयोगाकडे यंदाही शून्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आयोगाकडे तक्रारी दाखल नसल्याने हुंडाबळीच्या घटना घडत आहेत. याकडे महिला आयोगाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने राज्यातील कित्येक वैष्णवी अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
- अमोल राऊत