अनेक ‘स्टार’ उतरणार रेड कार्पेटवर
‘गाला प्रिमीयर शो’ नी रंगणार इफ्फी : आयनॉक्स परिसरासह सर्वत्र तयारी
पणजी : यंदाच्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध देशांच्या भाषांचे ‘गाला प्रिमियर शो’ होणार असून रेड कार्पेटवरही अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. हा महोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला असून त्यात 9 जागतिक प्रिमियर, 4 एशिया तर 1 इंडिया प्रिमियरचा समावेश आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव चांगला गजबजणार अशी चिन्हे आहेत. चित्रपट क्षेत्रातील नामवंत दिग्गज मंडळी राणा दागुबटी, विधु विनोद चोप्रा, सान्या मल्होत्रा, विक्रांत मासेय, आर. माधवन, ए. आर रेहमान, सौरभ शुक्ला ही मंडळी रेड कार्पेटवर येणार आहेत. त्यांना तेथे जवळून पाहण्याची संधी महोत्सवातील सहभागी झालेल्या प्रतिनिधींना मिळणार आहे. शिवाय विविध चित्रपटांचा प्रिमियर शो पहाण्याची पर्वणी साधता येणार आहे.
अनेक भाषांतील जागतिक चित्रपट
जागतिक दर्जाचे चित्रपट महोत्सवात समाविष्ट करण्यात आले असून त्यात ‘पियानो लेसन’, झिरो से रिस्टार्ट, साली मोहब्बत, स्नोफ्लोवर, पुणे हायवे, द मेहता बॉयज, जब खुली किताब हिसाब बराबर, हजार वेळा शेले पाहिलेला माणूस अशा विविध भाषिक चित्रपटांचा अंतर्भाव आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी, मल्याळम, तेलगू या भारतीय भाषांमधील चित्रपट त्यात असून इंग्रजी सोडून इतर सर्व भाषिक चित्रपटांना इंग्रजी सब टायटल्स देण्यात आली आहेत. 21 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत हे प्रिमियर शो व त्यातील कलाकार, इतर मंडळींचे रेड कार्पेट प्रदर्शन होणार आहे.