For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सख्ख्या बहीणींना भरधाव कारने उडवले! एकीचा मृत्यू तर दुसरी गंभीर

07:30 PM Jan 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
सख्ख्या बहीणींना भरधाव कारने उडवले  एकीचा मृत्यू तर दुसरी गंभीर
speeding car One died
Advertisement

उटगी जवळील दुर्दैवी घटना; शाळेतुन परतत असताना घडली घटना

उमदी वार्ताहर

जत तालुक्यातील उटगी येथे गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन शाळकरी सख्ख्या बहिणींना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकीचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने उमदी, उटगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दोन्ही बहिणी उमदी समता नगर येथील डेफोडीयल इंग्लिश मिडीयम स्कुल या ठिकाणी इयत्ता चौथी व दुसरीच्या वर्गात शिकत होत्या. यात श्रावणी उमेश लिगाडे वय 10 वर्ष हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर तिची लहान बहीण श्रद्धा उमेश लिगाडे वय 8 वर्ष ही जखमी झाली आहे. या दोघीही उटगी येथील रहिवाशी असून, त्या प्राथमिक शिक्षक उमेश लिगाडे यांच्या मुली आहेत.

Advertisement

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, उमदी येथील डेफोडीयल इंग्लिश मिडीयम स्कुल समतानगर येथे शिकत असलेल्या श्रावणी लिगाडे व श्रध्दा लिगाडे या शाळा सुटल्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान उटगी पासुन उमदीकडे काही अंतरावर असलेल्या लिगाडे यांच्या शेताजवळ स्कूल बस मधुन उतरुन आपल्या शेतातील घराकडे जात होत्या. याचवेळी उटगी कडुन उमदीकडे जात असलेल्या भरधाव कार क्रमांक एम. एच. 10. 2838 ने जोराची धडक दिल्याने या दोन्ही शाळकरी सख्ख्या बहिणींना गंभीर दुखापत झाली. हा अपघात होताच त्यांना तात्काळ उपचाराकरता जत कडे नेत असताना मोठी मुलगी श्रावणी हीचा मृत्यू झाला. तर श्रद्धा ही गंभीर जखमी झाली असुन तिला पुढील उपचारासाठी मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे . या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी, शाळेतील, भागातील अनेक शिक्षक व गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर मयत श्रावणी हिचे शवविच्छेदन जत ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. तर श्रद्धा हिला उपचारासाठी मिरज येथे हलवण्यात आले आहे. या अपघातातील कारचालकाचे नाव मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.

आजच उतरल्या शेताजवळ...
श्रावणी आणि श्रद्धा या दोन्ही मुली रोज शाळा सुटल्यानंतर स्कूल बस मधून थेट गावातील घरी जातात. पण आज रोडवरच असणाऱ्या त्यांच्या शेतात आजी आजोबा काम करत असल्याने, त्या तिथे उतरल्या होत्या. यात एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Advertisement

Advertisement
Tags :

.