आजपासून रेल्वे प्रवासाचे अनेक नियम बदलणार
प्रवाशांना भाडेवाढीचाही चटका : तत्काळ तिकीट बुकिंगसाठी कडक पडताळणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वेच्या 17 झोनसह 68 रेल्वे विभागांमध्ये आज, 1 जुलैपासून रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट बुकिंगशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी रेल्वे आरक्षण चार्ट लवकर तयार करणे, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी कडक पडताळणी करणे, प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये (पीआरएस) संपूर्ण सुधारणा करणे आणि लांब अंतराच्या रेल्वे भाड्यात थोडीशी वाढ करणे यांचा समावेश आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन रेल्वेने हे महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रेल्वेला मदत करण्याचे आवाहन रेल्वे प्रवाशांना करण्यात आले आहे.
नवीन बदलानुसार आजपासून रेल्वे भाड्यात थोडी वाढ होणार आहे. जर प्रवासी मेल किंवा एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करत असेल तर नॉन-एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर 1 पैसे आणि एसी क्लासमध्ये 2 पैशांची वाढ होणार आहे. तसेच 500 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी द्वितीय श्रेणीचे भाडे समान राहील. परंतु जर 500 किमी पेक्षा जास्त लांबचा प्रवास असल्यास भाड्यात प्रतिकिलोमीटर अर्धा पैसा जास्त आकारला जाणार आहे. तसेच यापूर्वी चार्ट 4 तास आधी बनवला जायचा, तो आता 1 जुलैपासून आठ तास आधी तयार होईल. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी आणि पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळणार आहे. या बदलामुळे विशेषत: दुर्गम आणि उपनगरीय भागातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.
डिसेंबर 2025 पर्यंत नवीन पीआरएस प्रणाली
रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) डिसेंबरपर्यंत पूर्णपणे अपग्रेड केली जाईल. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआरआयएस) या प्रकल्पावर काम करत आहे. नवीन पीआरएस प्रणाली सध्याच्या प्रणालीपेक्षा 10 पट जास्त भार हाताळण्यास सक्षम असेल. सध्या, प्रणाली प्रतिमिनिट 32,000 तिकिटे बुक करू शकते, परंतु नवीन प्रणालीमध्ये प्रतिमिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे बुक करण्याची क्षमता असेल. तसेच, तिकिटांशी संबंधित चौकशीची क्षमता देखील प्रतिमिनिट 4 लाखांवरून 40 लाखांपर्यंत वाढणार असल्याचा दावाही केला जात आहे.