For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समस्यांचा डेंगर; तरीही स्मार्ट सिटीचा पुरस्कार

11:25 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
समस्यांचा डेंगर  तरीही स्मार्ट सिटीचा पुरस्कार
Advertisement

महापौरांच्या बैठकीत अधिकारी धारेवर : पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्याचा निर्णय

Advertisement

बेळगाव : पहिल्याच पावसामध्ये शहरात विविध ठिकाणी पाणी साचून शहराला तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी पाण्याच्या निचऱ्याची समस्या गंभीर आहे. पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. अशी गंभीर समस्या असताना स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविलेल्या कामांना पुरस्कार कसा मिळाला? असा सवाल महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत नगरसेवकांनी उपस्थित केला. मान्सूनला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपामध्ये अधिकारी व नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी नगरसेवकांनी शहरातील समस्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात आलेली कामे योग्यप्रकारे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. तर रहदारीलाही अडथळा ठरत आहे. ग्लोब थिएटर, फोर्ट रोड, कार्पोरेशन कॉम्प्लेक्स, गोवावेस सर्कल आदी ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत.

पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसेल तर स्मार्ट सिटीतून राबविण्यात आलेल्या कामांना पुरस्कार कसा दिला जात आहे? असा प्रश्न नगरसेवक मुज्जम्मील डोणी यांनी उपस्थित करून बैठकीत सर्वांचे लक्ष वेधले. यावरून मनपा अधिकारी व स्मार्ट सिटी योजना अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. यावेळी मनपा अधिकारी व स्मार्ट सिटी योजना अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याकारणाने शहरातील समस्या वाढत चालल्या आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. कामाची जबाबदारी झटकली जात आहे. कामामध्ये सुसूत्रता नसल्याकारणाने शहरात समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी सदर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शहरातील पाणी साचणाऱ्या भागातील समस्यांवर तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी नगरसेवकांनी बैठकीत केली. यावेळी मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांनी ही समस्या कायमस्वरुपी दूर केली पाहिजे. यावर तात्पुरता तोडगा काढून उपयोग नाही. वारंवार समस्या निर्माण होत असल्यास नागरिकांतून आरोप करणे साहजिक आहे. यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी सूचना केली. दरम्यान पाणी साचणाऱ्या भागामध्ये नगरसेवक व अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करून समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

भूमिगत युजीडी लाईन ब्लॉक झाल्याने समस्या 

कोल्हापूर सर्कल येथील युजीडी पाईपलाईन फोडण्यात आल्याने त्यामध्ये गटारीचे पाणी शिरून वीरभद्रनगर, सुभाषनगर आदी परिसरात पाणी साचत आहे. ही समस्या तत्काळ दूर करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. शबरी हॉटेल येथील भूमिगत युजीडी लाईन ब्लॉक झाल्याने समस्या निर्माण होत आहे. याची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement
Tags :

.