गरजेपेक्षा अधिक उंची महिलेसमोर अनेक अडचणी
अधिक उंचीची इच्छा प्रत्येकालाच असते, परंतु जेव्हा उंची गरजेपेक्षा अधिक असल्यास काय घडेल? अशा स्थितीत जीवनात कोणकोणत्या अडचणी येतात हे एका युवतीने लोकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
ब्रिटनच्या एका महिलेने व्हिडिओ तयार करत स्वत:चा अनुभव शेअर केला आहे. महिलेची उंची 6.7 फूट आहे. सर्वसाधारणपणे उंचीला लोक एक आशीर्वाद मानतात, परंतु अनेकांसाठी हे समस्येचे कारण ठरले आहे. माझ्या असाधारण उंचीमुळे दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे कॅटीने सांगितले आहे.
अधिक उंचीमुळे मला कपडे खरेदी करण्यास मोठी अडचण होते, माझ्या आकाराचे कपडे मिळतच नाहीत. सामान्य दुकानांमध्ये माझ्यासाठी योग्य आकाराचे कपडे मिळणे जवळपास अशक्य आहे. याचबरोबर पादत्राणे खरेदी करणेही आव्हानच ठरते. याचमुळे योग्य आकाराची पादत्राणं मिळविण्यासाठी मला आगाऊ ऑर्डर द्यावी लागते असे कॅटीने सांगितले आहे.
सार्वजनिक परिवहन सेवतून प्रवास करणे देखील माझ्यासाठी डोकेदुखी आहे. कॅबमध्ये बसणे माझ्यासाठी अत्यंत अवघड आहे. उंचीमुळे मला अनेकदा वाकावे लागते, यामुळे पाठ अन् मानदुखी होते. याचबरोबर दरवाजातून जाणे, किचनमध्ये काम करणे, मित्रांसोबत छायाचित्रे काढून घेणे सर्वकाही माझ्यासाठी आव्हानात्मक असल्याचे ती सांगते.
माझ्यासाठी एक चांगला जोडीदार शोधणे देखील अत्यंत अडचणीचे ठरले आहे. लोक मला पसंत करतात आणि माझ्या उंचीचे कौतुकही करतात, परंतु विवाह किंवा दीर्घ नातेसंबंध ठेवण्यास टाळाटाळ करत असल्याचे तिचे सांगणे आहे. कॅटीने स्वत:ची असाधारण उंची आणि त्याच्याशी निगडित समस्या व्यक्त करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पेज तयार केले आहे. या पेजवर ती स्वत:च्या दैनंदिन जीवनातील अडचणी मजेशीर शैलीत दाखविते.