उमेदवारीसाठी अनेकांची धडपड
स्वत:च्या उमेदवारांसाठी मोन्सेरातांचा भाजपवर दबाव : भाजपच्या उमेदवारांकडून बंडखोरी होण्याची शक्यता
पणजी : पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी दोन गट तयार झाले असून त्यात उमेदवारी मिळावी म्हणून अनेकजण धडपड करीत आहेत. त्याशिवाय दोन्ही गटांना विरोधी गटातील उमेदवारांची प्रतीक्षा असून त्यांची नावे जाहीर होण्याची वाट पाहिली जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच उमेदवारांसाठी सामना रंगल्याचे दिसून येत आहे. पणजी मनपाचे एकूण 30 प्रभाग असून सध्या तेथे सत्ताधारी असलेल्या मोन्सेरात गटातर्फे सर्व प्रभागात उमेदवार देण्यात येणार आहेत. मोन्सेरात हे भाजपचे आमदार, मंत्री असले तरी ते पणजी मनपासाठी स्वत:चे उमेदवार देण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे भाजपातील काही इच्छुक उमेदवारांना पणजी मनपासाठी उमेदवारी मिळणे कठीण बनले आहे. परिणामी भाजपमध्ये बंडखोरीचा धोका असून काहीजण उमेदवारी न मिळाल्यास उत्पल पर्रीकर गटाकडे जाण्याची शक्यता आहे.
मोन्सेरात व भाजप दोन स्वतंत्र गट
पणजी मनपावर मोन्सेरात यांचे वर्चस्व असल्यामुळे ते सांगतील त्या उमेदवारास होकार देण्याशिवाय भाजपकडे कोणताही पर्याय नाही. भाजप सांगेल तो उमेदवार सर्व प्रभागात देण्याची तयारी मोन्सेरात यांना मान्य नाही. त्यामुळे उमेदवारांवरूनच भाजपमध्ये मोन्सेरात व भाजप असे दोन स्वतंत्र गट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातून बंडखोरी झाली तर पर्रीकर गटाचा फायदा होण्याची चिन्हे असल्याने ती टाळण्याचे प्रयत्न भाजपमध्ये होताना दिसत आहेत.
काँग्रेसचा पर्रीकर गटाला पाठिंबा
दरम्यान,काँग्रेस पक्षाने पणजी मनपा निवडणुकीसाठी पर्रीकर गटाला पाठिंबा दिला असून त्या गटाकरीता प्रचार करण्याचे निश्चित केले आहे. माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो हे काँग्रेसचे सदस्य असून ते पर्रीकर गटात सामील झाल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. पर्रीकर गटाशी सल्लामसलत करून काँग्रेस पक्षातर्फे काही उमेदवार पणजी मनपा निवडणुकीत उतरवले जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे.
केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल
पणजी महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत फक्त एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला असून तो प्रभाग 18 यामधून उदय च्यारी यांनी दाखल केला आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो हे आज 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज भरणार आहेत.