ज्ञानवापी मशिदीत हिंदू मंदिराचे अनेक पुरावे
कोर्ट कमिशनरच्या अहवालांमधून सत्य उघड, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
वाराणसी / वृत्तसंस्था
काशी विश्वेश्वराच्या परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या स्थानी पूर्वी हिंदू मंदिर असल्याचे अनेक पुरावे आता उघड झाले असून त्यांची सविस्तर माहिती सर्वेक्षणाच्या अहवालात देण्यात आली आहे. हे अहवाल गुरुवारी वाराणसी येथील न्यायालयात सादर करण्यात आले. शेषनाग, त्रिशूल, डमरु, कमलपुष्प, हिंदू देवतांच्या मूर्ती, हिंदू मंदिरांवर असते तसे नक्षीकाम, भिंतींवरील कोरीव काम, हिंदू धार्मिक चिन्हे आदी बाबी सर्वेक्षणात स्पष्टपणे दिसून आल्या आहेत.
विशेष कोर्ट कमिशनर विशाल सिंग आणि पदच्युत कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांनी सर्वेक्षणाचे अहवाल गुरुवारी सादर केले. अजय मिश्रा यांनी सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन दिवसांचा, तर विशाल सिंग यांनी सर्वेक्षणाच्या सर्व तीन दिवसांचा अहवाल सादर केला. हिंदूंच्या देवतांचे भग्न अवषेश मोठय़ा प्रमाणात आढळून आले आहेत, अशी माहिती विशाल सिंग आणि अजय मिश्रा यांनी दिली. कोर्ट कमिशनरांनी न्यायालयाला व्हिडीओ चित्रणाची ‘चिप’ही अहवालासह सादर केली. सहस्रावधी छायाचित्रे आणि अनेक तासांचे व्हिडीओ चित्रण या चिपमध्ये आहे.
शेषनागाचेही अस्तित्व
मशिदीच्या तळघरांमध्ये मोठय़ा प्रमाणात हे अवशेष आहेत. त्यांच्यात शेषनागाचेही भग्नावषेश आहेत. हे अवषेश किमान 500 ते 600 वर्षे जुने आहेत. मला मशिदीच्या तळघरात खोलवर जाऊ देण्यात आले नाही. मात्र, जे पाहिले ते थक्क करणारे होते, असे अजय कुमार मिश्रा यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना स्पष्ट केले. अजय कुमार मिश्रा यांना पहिल्या दोन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर हटविण्यात आले होते. त्यांनी अहवाल सादर करण्यापूर्वीच माहिती फोडली असा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला होता.
शिवलिंगसदृश आकाराचे दर्शन
मशिदीसमोरच्या तलावात शिवलिंगसदृश वस्तूचे दर्शन घडते. पण मुस्लिमांनी तो कारंजा आहे असा दावा केला आहे. म्हणून आपल्या अहवालात आपण त्याचा उल्लेख केलेला नाही, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले. विशाल सिंग यांनीही अशाच प्रकारचा अहवाल सादर केला असून सनातन हिंदू धर्माच्या अनेक खाणखुणा मशिदीत मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात, असे त्यांनीही स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
वाराणसी प्रकरणाची सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात होणार होती. तथापि, वादीपक्षाचे वकील हरी शंकर जैन यांची प्रकृती बरी नसल्याने ते न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत वाराणसीच्या न्यायालयाने कोणताही आदेश देऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयात काय घडते, याकडे लागलेले आहे.