कारवाईच्या भीतीने तालुक्यातील अनेक खडी मशीन बंद
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बजावणार नोटीस
बेळगाव : नियमांचे उल्लंघन केल्याने खाण व भूगर्भ खात्याकडून चार खडी मशिनला टाळे ठोकण्यात आले असल्याने तालुक्यातील बहुतांश ठिकाणच्या क्वॉरी चालकांनी भीतीपोटी आपल्या खडी मशिनी बंद ठेवल्या आहेत. मात्र नियमांचे उल्लंघन करत खडी मशिनी चालविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांना लवकरच कारवाईला सामोरे जावे लागणार असून त्यांना नोटीसा जारी केल्या जाणार असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. नवीन खडी मशिनी सुरू करण्यासह सध्या सुरू असलेल्या खडी मशिनी कशापद्धतीने चालविल्या जाव्यात याबाबतचे स्पष्ट निर्देश खाण व भूगर्भ खात्याकडून यापूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र तालुक्यातील सर्रास खडी मशिन चालकांकडून नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू असल्याचे खात्याच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे.
त्यातच तालुक्यात बेकायदा खनिज व्यवसाय सुरू असल्याचेही यापूर्वी उघडकीस आले आहे. त्यामुळे खाण व भूगर्भ खात्याकडून सदर बेकायदा खाण व्यवसाय बंद पाडण्यात आला आहे. यानंतर आता नियमांचे उल्लंघन करत खडी मशीन चालविणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गोजगे येथील चार खडी मशिनना टाळे ठोकण्यात आले असून कल्लेहोळ येथील खडी मशिनची पाहणी करण्यात आली आहे. यापैकी काही जणांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे कारवाईच्या भीतीने तेथील बहुतांश खडी मशिनी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र नियम धाब्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नसून संबंधितांना कायदेशीर नोटीस जारी केली जाणार असल्याचे खाण व भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.