अनेक देश अस्वस्थ, पण आम्ही नाही!
ट्रम्प यांच्या विजयानंतर विदेशमंत्र्यांची टिप्पणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचंड विजय झाल्याने अनेक देश काहीसे अस्वस्थ झाल्याचे दिसत असले, तरी भारताला अशी कोणतीही चिंता वाटत नाही, अशी टिप्पणी भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे. ते सोमवारी येथे आदित्य बिर्ला उद्योगसमूह शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या रौप्य महोत्सवात विचार व्यक्त करीत होते.
अमेरिकेतील अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या प्रचारकाळात ट्रम्प यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला होता. ते निवडून येणार नाहीत. कमला हॅरिस या त्यांच्या प्रतिस्पर्धीच आघाडीवर आहेत, अशी वृत्ते अगदी मतगणनेला प्रारंभ झाल्यानंतरही प्रसारित करण्यात येत होती. तशा सर्वेक्षणांचे अहवालही समोर येत होते. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांनी या सर्व भाकितांना फोल ठरवित मोठा विजय तुलनेने सहजगत्या मिळविल्याचे दिसून आले होते. तसेच ज्या सात प्रांतांवर या निवडणुकीचा परिणाम अवलंबून होता, त्या सर्व सात राज्यांमध्ये ट्रम्प यांना बहुमत मिळाले होते. तसेच सिनेट आणि कनिष्ठ सभागृहातही रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होत असल्याचे दिसत आहे. सिनेटमध्ये या पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे, तर कनिष्ठ सभागृहासाठीची मतगणना अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र, या निवडणुकीतही रिपब्लिकन पक्ष आघाडीवर असून बहुमताच्या जवळ पोहचला आहे.
काही देश चिंतातूर
ट्रम्प यांचा विजय झाल्याने अनेक देश अस्वस्थ आहेत. काही देश चिंतातूर आहेत. तर काही देश धास्तावले आहेत. ही स्थिती स्पष्टपणे दिसून येत असल्याने ती लपविण्यात अर्थ नाही. ट्रम्प यांच्या विजयामुळे जागतिक समीकरणांमध्ये परिवर्तन होईल काय, या प्रश्नाचीच सध्या जगात चर्चा आहे. परिवर्तन झालेले आहे, हे निश्चित आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र हे परिवर्तन जाणवत आहे, हे मान्य केले पाहिजे. भारताची आर्थिक स्थिती, भारताचे आर्थिक स्थान, भारतीय उद्योग क्षेत्र, भारतीय उद्योगक्षेत्राची व्याप्ती, त्याचा प्रभाव आदी सर्व क्षेत्रांमधील मान्यवरांशी माझा संवाद होत आहे. सर्वांच्या मतानुसार जागतिक समीकरणे आता नव्याने मांडली जाणार आहेत, हे स्पष्टपणे जाणवत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भांबावण्याची आवश्यकता नाही
आजही पाश्चिमात्य उद्योग क्षेत्राचा जगावर प्रभाव आहे. पारंपरिक आणि पायाभूत यंत्रोद्योग व्यवस्थेत आजही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. अनेक पाश्चिमात्य देशांकडे भक्कम आर्थिक आणि औद्योगिक पाया असून तंत्रवैज्ञानिक संशोधनही मोठ्या प्रमाणात केले जाते. अमेरिकेतील निवडणुकीचा जो परिणाम समोर आला, त्याचा या साऱ्यावर काही ना काही प्रभाव पडणार आहे. तथापि, त्यामुळे भांबावून जाण्याचे कारण नाही. तसेच टोकाचे निष्कर्ष काढून जगासंबंधीची आपली समजूत बदलण्याचीही आवश्यकता नाही. भारताला यासंबंधी कोणतीही चिंता वाटत नाही, अशी मांडणी जयशंकर यांनी केली.
बॉक्स
भारतावर परिणाम काय होणार ?
अमेरिकेतील निवडणुकीचा भारतावर परिणाम काय होईल, असा प्रश्न जयशंकर यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. भारताला अमेरिकेतील राजकीय सत्तापरिवर्तनाची चिंता भेडसावत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेहमीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी जवळीकीचे संबंध राहिले आहेत. प्रथम बराक ओबामा, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प, त्याच्यानंतर जोसेफ बायडेन या सर्व राष्ट्राध्यक्षांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्यप्रकारे विश्वासाचे संबंध प्रस्थापित पेले. विजय मिळविल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम जे तीन दूरध्वनी स्वीकारले, त्यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरध्वनीचा समावेश होता, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे आम्ही तुलनेने निश्चिंत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.