तेलंगणात विद्युतवाहनांना अनेक सवलती
वृत्तसंस्था / हैद्राबाद
तेलंगणा राज्यात वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी अनेक सवलती देण्याचा निर्णय तेथील सरकारने घोषित केला आहे. या वाहनांना मार्ग कर आणि नोंदणी शुल्कातून 100 टक्के मुक्ती दिली जाणार आहे. विद्युत वाहने लोकांना प्रिय व्हावीत आणि त्यांची विक्री अधिक प्रमाणात व्हावी, जेणेकरुन वायू प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण आणता येईल, असे राज्यसरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
ही कर आणि नोंदणीशुल्क मुक्ती वीजेवर चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी, व्यापारी नागरीक वाहतूक करणारी वाहने, टॅक्सी, तीन आसनी ऑटोरिक्षा, मालवाहतूक करणारी हलकी वाहने, ट्रॅक्टर्स आणि बसेस इत्यादी वाहनांना देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांनाही ही सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत येत्या दोन वर्षांसाठी, अर्थात 31 डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत जी विद्युत वाहने नोंद केली जातील, त्यांना ही सवलत ‘लाईफ लाँग’ दिली जाणार आहे, अशी माहिती तेलंगणाचे वाहतूक आणि मागावर्गीय कल्याण मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी दिली आहे.
दिल्लीच्या प्रदूषणापासून धडा
दिल्लीत प्रत्येक वर्षी हिंवाळ्यात वायू प्रदूषणाची समस्या अतीतीव्र बनते. यावर्षी तर तेथे प्रदूषणाने कहर केला आहे. दिल्लीसारखी परिस्थिती तेलंगणांतील शहरांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी राज्यात वीजेवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. लोकांनी अधिकाधिक प्रमाणात अशी वाहने खरेदी करावीत, यासाठी या सलवती देऊ करण्यात आल्या आहेत. लोकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेलंगणा सरकारने केले आहे.
चार्जिंग स्टेशन्स आवश्यक
विद्युत वाहनांसाठी राज्यात पुरेशा प्रमाणात चार्जिंग स्टेशन्स आहेत काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. हे उत्तदायित्व विद्युत वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी उचलावे. सरकार त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करेल. सध्या तेलंगणात वाहनांची चार्जिंग स्टेशन्स कमी प्रमाणात असली, तरी आवश्यकता निर्माण झाल्यानंतर ही समस्याही दूर होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.