For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौथ्या टप्प्यात अनेक ‘क्लोज कॉन्टेस्ट्स्’

06:04 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
चौथ्या टप्प्यात अनेक ‘क्लोज कॉन्टेस्ट्स्’
Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणूक मतदानाच्या चौथ्या टप्प्यात अनेक मतदारसंघ असे आहेत, की ज्यांच्यात मागच्या निवडणुकीत अतिशय कमी मतांच्या अंतराने विजय किंवा पराभव झालेला आहे. या मतदारसंघांकडे साऱ्यांचे लक्ष आहे. कारण या निवडणुकीत त्यांच्यापैकी जास्तीत जास्त जो पक्ष किंवा युती जिंकू शकेल, या पक्षाला किंवा युतीला पारडे जड करता येणार आहे. असे मतदारसंघ मतदानाच्या सर्व सातही टप्प्यांमध्ये आहेतच. पण चौथ्या टप्प्यात त्यांची संख्या अन्य कोणत्याही टप्प्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा मतदारसंघांचा आणि चौथ्या टप्प्याच्या इतर वैशिष्ट्यांचा परामर्ष महत्वाचा आहे....

Advertisement

एक टक्क्यापेक्षा कमी अंतर...

? चौथ्या टप्प्यात विजयाचे अंतर एक टक्क्यापेक्षा कमी असणाऱ्या 12 जागा होत्या. आंध्र प्रदेशात तेलगु देशम पक्षाने ज्या तीन जागा गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या, त्या सर्व एक टक्क्यापेक्षा कमी अंतराने पदरात पाडून घेतल्या होत्या. विजयवाडा (0.7 टक्के अंतर), श्रीकाकुलम (0.6 टक्के अंतर) आणि गुंटूर (0.4 टक्के अंतर) या त्या जागा आहेत. यंदा या जागा अधिक अंतराने जिंकण्यासाठी या पक्षाने जोर लावला आहे. तर प्रतिस्पर्धी वायएसआर काँग्रेसनेही गेल्या वेळचे थोडक्यात आलेले अपयश धुवून काढण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे यंदाही या सर्व जागांवर मोठ्या चुरशीच्या संघर्षाची तज्ञांना अपेक्षा आहे.

Advertisement

? तेलंगणात काँग्रेसनेही मालकाजगिरी मतदारसंघात 0.7 टक्के अंतराने विजय मिळविला होता. तर याच राज्यातील भोंगीरची जागा या पक्षाने 0.4 टक्क्यांच्या निसटत्या अंतराने मिळविली होती. त्याचप्रमाणे विशाखापट्टणम आणि गुंटूर या आंध्रातीलच जागा अशाच एक टक्क्यापेक्षा कमी अंतराने जिंकल्या गेल्या होत्या. झारखंडमधील खुंटीची जागा 0.6 टक्के मतांच्या अंतरात, महाराष्ट्रातील औरंगाबादची जागा 0.8 टक्के मतांच्या अंतरात, तर कोरापूट (ओडीशा), जहीराबाद (तेलंगणा) आणि बर्धमान-दुर्गापूर (पश्चिम बंगाल) या जागांचा निर्णयही अशाच थोडक्या अंतरात झाला होता, असे आकडेवारी सांगते.

प्रचंड मताधिक्क्याने विजय कोठे...

या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जे मतदारसंघ आहेत, त्यांच्यापैकी केवळ 3 मतदारसंघ असे होते की जेथे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या तरी पक्षाला प्रचंड मोठे मताधिक्क्य मिळाले होते. 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मताधिक्क्य गेल्यावेळी असणारा एकही मतदारसंघ या टप्प्यात नाही. त्यामुळेच हा टप्पा चुरशीच्या स्पर्धेचा मानला गेलेला आहे. पलामू, जळगाव आणि श्रीनगर या तीन मतदारसंघांमध्ये मोठे विजय झालेले होते. मात्र, मोठ्या विजयांचे प्रमाण या टप्प्यात अन्य टप्प्यांच्या मानाने मागच्या निवडणुकीत कमी होते, हे देखील आकडेवारीवर दृष्टीक्षेप केला असता स्पष्ट होत आहे.

विशिष्ट दिशा देणारा टप्पा...

?यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा हा टप्पा निवडणुकीला विशिष्ट दिशा देणारा टप्पा म्हणून ओळखला जात आहे. ही निवडणूक दोन प्रतिस्पर्धी आघाड्यांपैकी कोणत्या आघाडीकडे सरकणार, हे विविध पक्षांच्या या टप्प्यातील कामगिरीवर ठरणार आहे, असे मत अनेक विश्लेषकांनी विविध माध्यमांमधून व्यक्त केले आहे.

?या टप्प्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 2019 मधील जागा राखल्या, तरी तेवढे पुरेसे मानले जात आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अधिक यश मिळविण्याची संधीही आहे.

?विरोधी पक्षांच्या आघाडीला तिच्या मागच्या निवडणुकीतील जागा तर टिकवाव्या लागतीलच, शिवाय आणखी जागा मिळविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. विशेषत: काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या टप्प्यातील 96 जागांपैकी केवळ 6 जागांवर यश मिळविता आल्याचे दिसते.

?म्हणून काँग्रेससाठी हा टप्पा निर्णायक मानला जात आहे. काँग्रेसला अधिक जागा या टप्प्यात मिळाल्या नाहीत, तर तो पक्ष स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता  तज्ञांकडून व्यक्त केली जाते. तथापि, यावेळी काँग्रेसने जागाच कमी लढविल्याने हा टप्पा गाठणे शक्य होणार का असा प्रश्नही अनेक विश्लेषक उपस्थित करतात.

?भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यासाठी हा टप्पा आव्हानात्मक असला तरी यशाच्या शक्यतेचाही मानला गेलेला आहे. विशेषत: ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अधिक जागा जिंकण्याची संधी आहे, तेथे या पक्षाची कामगिरी समाधानकारक झाल्यास ही निवडणूक त्याच्या दिशेने कलू शकते.

कोणते मतदारसंघ बळकट...

? ज्या प्रमाणे चौथ्या टप्प्यात काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीचे निर्णय मिळाले होते, त्याच्या उलट या टप्प्यातील 20 मतदारसंघ असे आहेत, की जेथे कोणता तरी एक पक्ष प्रचंड भक्कम आहे. या मतदारसंघातून हा पक्ष सातत्याने अनेकदा निवडून आलेला आहे आणि मतांचे अंतरही मोठे असल्याचे दिसते.

? मेहबूबनगर, मेडक, मावळ, शिर्डी, बहरामपूर, नलगोंडा, अहमदनगर, बीड, दरभंगा, इंदूर, जळगाव, जालना, खरगाव, खुंटी, लोहारडागा, रावेर, बेरहामपूर, बीरभूम, कृष्णनगर आणि हैद्राबाद हे मतदारसंघ अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे गढ मानले गेले आहे. येथे या पक्षाला हरविणे अशक्यकोटीतील आहे.

Advertisement
Tags :

.