For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनवंत कुमार, श्रेयस गोपाळची चमक

06:27 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनवंत कुमार  श्रेयस गोपाळची चमक
Advertisement

आसामवर कर्नाटकचा एक डाव आणि 314 धावांनी दणदणीत विजय

Advertisement

वृत्तसंस्था, गुवाहाटी

रणजी ट्रॉफी ‘एलीट ग्रुप बी’ सामन्यात बुधावारी कर्नाटकाने आसामचा एक डाव आणि 314 धावांनी पराभव केला. मनवंत कुमारच्या आक्रमक नाबाद शतकानंतर फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाळ आणि शिखर शेट्टी यांनी आसामच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

Advertisement

या विजयामुळे कर्नाटकला बोनस गुणासह एकूण सात गुण मिळाले असून 16 गुणांसह ते गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचले आहेत. कालच्या 5 बाद 496 धावांच्या पुढे खेळताना कर्नाटकने आपला पहिला डाव 6 बाद 577 धावांवर घोषित केला आणि 442 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर लेग स्पिनर श्रेयस (4-39) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज शिखर शेट्टी (3-28) यांनी आसामच्या फलंदाजांना तंबूत धाडत त्यांना 40.2 षटकांत 128 धावांत गुंडाळले. यामुळे आठवेळा चॅम्पियन ठरलेल्या कर्नाटकने सामना एक दिवसापेक्षा जास्त वेळ शिल्लक असतानाच जिंकला.

दिवसाची सुरुवात 53 धावांवर करणाऱ्या मनवंतने अवघ्या 108 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. अमलज्योती दासच्या चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने हा टप्पा गाठला. 22 वर्षीय मनवंतचे या हंगामातील हे दुसरे शतक आहे. कर्नाटकच्या खालच्या फळीतील फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या मनवंतने दोन आठवड्यांपूर्वी बेंगळूरच्या अलूर येथे सौराष्ट्रविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिले प्रथम श्रेणी शतक झळकावले होते. आसामच्या दुसऱ्या डावात कर्णधार डॅनिश दासने 74 चेंडूत 50 धावा केल्या. परंतु कर्नाटकच्या विजयाचा मार्ग रोखण्यासाठी हे पुरेसे ठरले नाही.

संक्षिप्त धावफलक : आसाम प. डाव सर्व बाद 135, दु.डाव 40.2 षटकांत सर्वबाद 128 (डॅनिश दास 50, श्रेयस गोपाळ 4-39, शिखर शेट्टी 3-28) यांचा कर्नाटककडून एका डावाने आणि 314 धावांनी पराभव झाला. कर्नाटक 133.2 षटकांत 6 बाद 577 (के.व्ही. अनिश 145, एल. मनवंत कुमार 100 नाबाद), कर्नाटक 7 गुण.

Advertisement
Tags :

.