हिमेशसोबत दिसणार मानुषी
हिमेश रेशमियाने स्वत:च्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. याचे शीर्षक ‘शराब‘ असून यात तो मानुषी छिल्लरसोबत दिसून येणार आहे. याचे एक पोस्टर शेअर करण्यात आले असून यात हिमेश अन् मानुषी रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. तसेच या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
हिमेशच्या गायनाची त्याच्या चाहत्यांदरम्यान वेगळीच क्रेझ आहे. आता तो स्वत:चे नवे गीत ‘शराब’द्वारे चाहत्यांना वेड लावण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. याचा म्युझिक व्हिडिओ पीयूष-शाजिया यांनी कोरियोग्राफ केले आहे. तर गाण्याला हिमेशचा आवाज लाभला असून रजत नागपालने संगीतबद्ध केले आहे. तर गीतलेखन राणा सोतल यांनी केले आहे.
हिमेश रेशमिका मागील काही महिन्यांपासून स्वत:च्या पॅन-इंडिया म्युझिक टूरमध्ये व्यग्र राहिला आहे आणि अनेक शहरांमध्ये तो परफॉर्म करतोय. ‘तंदूरी नाइट्स’ आणि ‘हुक्का बार’ यासारख्या पसंतीच्या गाण्यांपासून ‘लाँग ड्राइव्ह’ आणि ‘झलक दिखला जा’ यासारख्या हिट गाण्यांपर्यंत त्याला स्टेजवर स्वत:चे चार्टबस्टर्स गाताना पाहिले गेले आहे.