उत्पादन क्षेत्राचा विकासदर 18 महिन्यातील नीचांकावर
डिसेंबरमधील उत्पादन क्षेत्राची आकडेवारी सादर : फॅक्टरी ऑर्डरसह उत्पादनातील मंदीचा परिणाम
नवी दिल्ली :
कमी चलनवाढ असूनही, फॅक्टरी ऑर्डर आणि उत्पादनातील मंद वाढीमुळे डिसेंबरमध्ये देशाच्या उत्पादन क्षेत्राची वाढ 18 महिन्यांतील किंवा दीड वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरली. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
एचएसबीसी इंडियाचे मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय सर्वेक्षण फॅक्टरी ऑर्डर आणि आउटपुटमध्ये माफक वाढ दर्शवते. तथापि, आगामी वर्षासाठी व्यावसायिक आत्मविश्वास मजबूत झाला आहे. हे सर्वेक्षण एस अॅण्ड पी ग्लोबलने केले आहे. हंगामी समायोजित एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स डिसेंबर 2023 मध्ये 54.9 वर घसरला. हा 18 महिन्यांतील सर्वात कमी स्तर आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये तो 56 च्या पातळीवर होता. पीएमआय भाषेत, 50 च्या वर म्हणजे विस्तार. तर 50 पेक्षा कमी आकुंचन दर्शवते. एस अॅण्ड पी ग्लोबलने जवळपास 400 उत्पादकांच्या खरेदी व्यवस्थापकांना पाठवलेल्या प्रश्नावलीच्या प्रतिसादावर आधारित एचएसबीसी इंडियाचे मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय तयार केले आहे.
एचएसबीसीचे भारतातील मुख्य अर्थतज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले, भारताच्या उत्पादन क्षेत्राचा डिसेंबरमध्ये विस्तार होत राहिला. मात्र, गेल्या महिन्यात विकासाचा वेग मंदावला. उत्पादन आणि नवीन ऑर्डर या दोहोंची वाढ मंदावली आहे. तथापि, नोव्हेंबरपासून भविष्यातील उत्पादन निर्देशांक वाढला आहे. मंदावलेली वाढ असूनही, डिसेंबरमध्ये या क्षेत्राचा जोरदार विस्तार झाला.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की अनुकूल बाजार परिस्थिती, मेळे आणि प्रदर्शनांमुळे डिसेंबरमध्ये उत्पादनात वाढ झाली आहे. डिसेंबरच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की देशातील वस्तू उत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय ऑर्डरच्या प्राप्तीमध्ये वाढ झाली आहे.
आशिया, युरोप, पश्चिम आशिया आणि उत्तर अमेरिका या देशांतून कंपन्यांनी लक्षणीय नफा मिळवल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.