दूरसंचार उपकरणांचे उत्पादन नव्या शिखरावर
सरकारच्या पीएलआय योजनेचे पाठबळ : विक्री 50 हजार कोटींच्या पुढे
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दूरसंचार उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेने एक नवा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, दूरसंचार उपकरणे निर्मितीची विक्री 50 हजार कोटींच्या पुढे गेली असल्याची माहिती आहे केंद्र सरकारने सामायिक केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की, तीन वर्षांत, टेलिकॉम पीएलआय योजनेने 3,400 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. दूरसंचार उपकरणांच्या उत्पादनाने 50,000 कोटी रुपयांचा सार्वकालिक उच्चांक ओलांडला असून सुमारे 10,500 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. यामुळे 17,800 हून अधिक प्रत्यक्ष आणि अनेक अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
टेलिकॉम पीएलआयद्वारे 17,800 थेट नोकऱ्या
या योजनेअंतर्गत एकूण 17,800 थेट नोकऱ्या निर्माण झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, हे यश भारताच्या दूरसंचार उत्पादन उद्योगाची मजबूत वाढ आणि स्पर्धात्मकता अधोरेखित करते. हे यश सरकारी योजनांद्वारे मिळाले आहे, कारण सरकारने देशांतर्गत स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे आणि आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.
उत्पादन व निर्यात क्षेत्रात प्रचंड तेजी
सरकारी आकडेवारीनुसार, या पीएलआय योजनेचा परिणाम म्हणून, भारतातून मोबाईल फोनचे उत्पादन आणि निर्यात या दोन्हींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये भारत हा मोबाईल फोनचा मोठा आयातदार होता. त्यावेळी देशात केवळ 5.8 कोटी युनिट्सचे उत्पादन झाले होते, तर 21 कोटी युनिट्सची आयात करण्यात आली होती, परंतु 2023-24 पर्यंत सरकारच्या पुढाकाराने याबाबतीतले संपूर्ण चित्रच पालटले आहे. दूरसंचार उपकरणे सध्या उत्तर अमेरिका आणि युरोपला निर्यात केली जात आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी पीएलआय योजना काय आहे?
‘मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उत्पादन’ साठी पीएलआय योजना लागू आहे. याअंतर्गत कंपन्या मोबाईल फोन आणि त्यांचे घटक तयार करतात. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहे. उत्पादनाला प्रोत्साहन मिळवून देतानाच सरकारकडून सवलतीचा लाभही कंपन्यांना उठवता येत आहे. पीएलआय योजनेचे उद्दिष्ट देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि दूरसंचार उपकरणे निर्मितीसाठी भारताला जागतिक केंद्र बनवणे आहे.