मनू भाकर, डी गुकेशसह चौघे खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
नेमबाज स्वप्नील कुसाळे, पॅरा अॅथलिट सचिन खिलारी यांना अर्जुन तर मुरलीकांत पेटकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शुक्रवारी राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांच्यासह भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, कोल्हापूरचा ऑलिम्पिक नेमबाज स्वप्निल कुसाळे, सांगलीचा पॅरा अॅथलिट सचिन खिलारीसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. देशाला पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सांगलीच्या मुरलीकांत राजाराम पेटकर यांचाही अर्जुन जीवनगौरव पुरस्काराने सम्मान करण्यात आला.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने 2 जानेवारी रोजी खेलरत्न व अर्जुन पुरस्काराची घोषणा केली होती. यानतंर सर्व विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले.
गतवर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताची अव्वल नेमबाज मनू भाकरने 2 पदके जिंकून इतिहास रचला होता. एकाच ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धांमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तसेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळाले. पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट असलेल्या हरमनप्रीतला आपल्या तगड्या कामगिरीसाठी सर्वोच्च पुरस्काराने शुक्रवारी गौरवण्यात आले. याशिवाय, डी गुकेश हा काही आठवड्यांपूर्वीच बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता. त्याने वयाच्या 18 व्या वर्षी जगज्जेतेपद मिळविले होते. प्रवीण कुमारने पॅरालिम्पिकच्या टी 64 प्रकारातील उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. क्रीडा क्षेत्रातील अनमोल कामगिरीसाठी या चौघांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
32 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव
दरम्यान, खेलरत्न पुरस्कारा व्यतिरिक्त खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 34 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळे, धावपटू ज्योती याराजी, बॉक्सर नितू सिंग यांचा समावेश आहे. तसेच सुचा सिंग आणि पॅरा जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन पुरस्कार जीवनगौरव प्रदान करण्यात आला. तर कोचिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पाच जणांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. यामध्ये बॅडमिंटन प्रशिक्षक एस मुरलीधरन आणि फुटबॉल प्रशिक्षक अरमांडो अॅग्नेलो कुलासो यांचा आजीवन श्रेणीत समावेश आहे. स्वप्निल कुसाळेच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024
गुकेश डी (बुद्धिबळ), हरमनप्रीत सिंह (हॉकी), प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
मनू भाकर (नेमबाजी).
अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू
स्वप्नील कुसाळे (शूटिंग), सचिन खिलारी (पॅरा अॅथलेटिक्स), ज्योती याराजी (अॅथलेटिक्स), अन्नू राणी (अॅथलेटिक्स), नितू (बॉक्सिंग), स्वीटी बोरा (बॉक्सिंग), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), सलीमा टेटे (हॉकी), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जर्मनप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत सिंह (हॉकी), राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी), प्रीती पाल (पॅराअॅथलेटिक्स), जीवनजी दीप्ती (पॅरा अॅथलेटिक्स), अजित सिंह (पॅराअॅथलेटिक्स), धरमबीर (पॅराअॅथलेटिक्स), प्रणव सूरमा (पॅराअॅथलेटिक्स), एच होकातो सेमा (पॅराअॅथलेटिक्स), सिमरन (पॅराअॅथलेटिक्स), नवदीप (पॅराअॅथलेटिक्स), नितेश कुमार (पॅराबॅडमिंटन), सुश्री तुलसीमाथी मुरुगेसन (पॅराबॅडमिंटन), नित्या सिवन (पॅराबॅडमिंटन), मनिषा रामदास (पॅराबॅडमिंटन), कपिल परमार (पॅरा जुडो), मोना अग्रवाल (पॅराशूटिंग), रुबिना फ्रान्सिस (पॅराशूटिंग), सरबज्योत सिंह (शूटिंग), अभय सिंह (स्क्वॅश), साजन प्रकाश (स्विमिंग), अमन सेहरावत (कुस्ती).