अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 30 वर्षांचा कठोर कारावास
प्रतिनिधी/ बेळगाव
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोक्सो न्यायालयाने 30 वर्षांचा कठोर कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाशप्पा रामप्पा नेरले (वय 26 रा. कब्बुर, ता. चिकोडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी शनिवार दि. 5 रोजी हा निकाल दिला आहे.
अल्पवयीन मुलगी शाळेला ये-जा करताना आरोपी तिला चिडवत होता. ही बाब कुणाला सांगितलीस तर तुझ्या आई-वडिलांना जीवानीशी सोडणार नाही, अशी धमकीही तो देत होता. 8 मार्च 2020 रोजी एका विहिरीजवळ अल्पवयीन मुलीला येण्यास आरोपी वाशप्पाने सांगितले. अल्पवयीन मुलगी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन त्या ठिकाणी गेली. आरोपीने मुलीसोबत आलेल्या मित्रांना चॉकलेट देऊन विहिरीजवळ बसवले आणि अल्पवयीन मुलीला तिचा हात धरून ओढून नेण्याचा प्रयत्न केला. त्याला मुलीने विरोध केल्याने रागाच्या भरात आरोपीने मुलीच्या श्रीमुखात भडकवले. त्यानंतर बलात्कार केला. ही बाब कुठे सांगितलीस तर तुझ्या आई-वडिलांना ठार मारू, अशी धमकीही त्याने दिली. याप्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केला. न्यायालयात 16 साक्षी, 30 कागदोपत्री पुरावे आणि 12 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यावेळी गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला 30 वर्षांचा कठोर कारावास व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून 4 लाख रुपयांची आर्थिक भरपाईदेखील देण्याचा आदेश बजावण्यात आला. सरकारी पक्षातर्फे अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.