मनोलो मार्केझची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदास सोडचिठ्ठी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या अलीकडील घसरणीची जबाबदारी निश्चित करण्याच्या दबावाखाली असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची सहमती झाल्यानंतर टीकेचे लक्ष्य बनलेले भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक मनोलो मार्केझ यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
एआयएफएफच्या कार्यकारी समितीने येथे झालेल्या बैठकीत 56 वर्षीय मार्केझ यांनी त्यांच्या कराराचे एक वर्ष शिल्लक असतानाही आपल्याला पदभारातून मोकळे करावे अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना पदावरून हटण्यास सहमती दर्शविली. ‘एआयएफएफ आणि मनोलो यांनी दोन्ही बाजूंना कोणताही आर्थिक परिणाम सहन करावे न लागता परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना भारताच्या प्रशिक्षकपदाच्या भारातून मोकळे करण्यात आले आहे. एआयएफएफ लवकरच मुख्य प्रशिक्षकपदासाठी जाहिरात देईल, असे महासंघाचे उपसरचिटणीस के. सत्यनारायण यांनी सांगितले.
सदर स्पॅनिश व्यक्तीची जून, 2024 मध्ये दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या वर्षी त्यांनी दुहेरी भूमिका बजावली. कारण 2024-25 हंगामासाठी ते इंडियन सुपर लीगमधील संघ एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ अपेक्षित कामगिरी करून दाखवू शकला नाही. 10 जून रोजी एएफसी आशियाई कप पात्रता फेरीच्या अवे सामन्यात भारताला खालच्या क्रमांकावर विसावलेल्या हाँगकाँगकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे 2027 मध्ये होणार असलेल्या सदर स्पर्धेची पात्रता मिळवण्याची संधी गमावण्याचा धोका निर्माण झाला.
मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने गेल्या आठ सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवलेला असून मार्चमध्ये मालदीवविऊद्ध हा एकमेव विजय नोंदला गेला. यावर्षी भारतीय संघ आतापर्यंत चार सामने खेळलेला आहे. त्यापैकी त्यांनी एक जिंकला आहे, एक सामना बरोबरीत सोडविला आणि दोन गमावले. भारतीय संघाच्या खराब निकालांमुळे माजी कर्णधार आणि प्रतिष्ठित स्ट्रायकर सुनील छेत्रीही संघात परतल, परंतु त्यामुळे संघाचे नशीब सुधारू शकलेले नाही.