जरांगेंचे निकटवर्तीय संजय कटारे यांच्यावरील 4.90 कोटींचा वाळू उत्खनन दंड कायम; अजय बारस्करांचा जरांगेंवरही हल्लाबोल
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय नानासाहेब कटारे यांच्याशी संबंधित अवैध वाळू उत्खनन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी कटारे यांना दंडाच्या कारवाईतून वगळणारा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश रद्द केला असून, 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा दंड कायम ठेवण्यात आला आहे. ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव आणि डोमलगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून सुमारे 2 हजार ब्रास अवैध वाळू उत्खनन झाल्याच्या प्रकरणात 18 जणांवर कारवाई करण्यात आली होती. 2023 मध्ये संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संजय कटारे यांच्या आक्षेपानंतर तत्कालीन तहसीलदारांनी त्यांचे नाव दंडाच्या कारवाईतून वगळले होते. या निर्णयाविरोधात अजय महाराज बारस्कर यांनी तक्रार केल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
चौकशीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कटारे यांना दंडातून वगळण्याचा आदेश रद्द करत मूळ दंडात्मक आदेश पूर्ववत केला. तसेच संबंधित रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तत्कालीन तहसीलदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही चौकशीत निरीक्षणे नोंदवण्यात आली असून, त्यांच्याविरोधात शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाळू उत्खनन प्रकरणात जरांगे आणि तहसीलदार यांचीही भूमिका तपासली जावी, असा दावा बारस्कर यांनी केला. तसेच संजय कटारे यांच्याशी जरांगे यांचा संबंध काय, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. जरांगे यांच्यावर वाळू चोरीसंदर्भातही त्यांनी आरोप केले आहेत.
बारस्कर यांनी जरांगे यांच्या वाहनासह इतर आर्थिक व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित केले असून, यापूर्वी या आरोपांबाबत त्यांनी ईडीकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे.