‘जनता सत्तेवर बसवते, खालीही खेचू शकते’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मुंबई : नारायणगड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत शेतकरी आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरही जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यातील संबंधांबाबत संशय निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे म्हटले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. आंदोलनकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरू राहिल्यास मराठा समाज अधिक ताकदीने एकत्र येईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. अतिवृष्टी, पावसाची कमतरता आणि आर्थिक अडचणींमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि गरजू भागांत चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
“जनता सत्तेवर बसवू शकते आणि वेळ आल्यास सत्तेतून खालीही खेचू शकते,” असा इशारा देत जरांगे पाटील यांनी सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, असे म्हटले.
सरकारकडून दबाव आणण्याचे प्रयत्न झाले तरी मराठा समाजाने शांतता आणि एकजूट कायम ठेवावी. आपल्याला झुकवण्याचे प्रयत्न झाल्यास समाजाने अधिक ताकदीने संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.