For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा आरक्षणाचा तिढा चर्चेतून सोडवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जरांगेंना स्पष्ट संदेश

04:14 PM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
मराठा आरक्षणाचा तिढा चर्चेतून सोडवणार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
Advertisement

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मेळावे घेऊ नयेत तसेच मेळावा उधळून लावण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत चर्चेतूनच मार्ग काढण्यावर भर दिला आहे.

Advertisement

फडणवीस म्हणाले की, आंदोलनाच्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित असून ते आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. यापूर्वीही सरकारने विविध प्रश्नांवर चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला असून, पुढेही चर्चेतून तोडगा काढला जाईल.

ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या नसतील, अशा सर्व मागण्यांसाठी आम्ही चर्चेची दारे खुली ठेवली आहेत,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरुवातीपासूनच संवेदनशीलतेने काम करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची सरकारची भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्या मेळाव्यांना विरोध करण्याचा इशारा दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, सरकारने आंदोलनाला सामोरे जाताना कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीत राहून संवादाचा मार्ग स्वीकारला असल्याचे फडणवीस यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :

.