For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनोज जरांगेंना पुन्हा धक्का; मुंबई पोलिसांनी आंदोलनाचा दुसरा अर्जही फेटाळला

08:20 PM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनोज जरांगेंना पुन्हा धक्का  मुंबई पोलिसांनी आंदोलनाचा दुसरा अर्जही फेटाळला
Advertisement

मुंबई: मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी त्यांनी केलेला दुसरा अर्जही मुंबई पोलिसांनी नाकारला आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील पुढील कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

मनोज जरांगे पाटील सध्या अंतरवाली सराटी येथे उपोषण करत असून, त्यांनी १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, १२ सप्टेंबर रोजी त्यांचा पहिला अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी त्यांनी पुन्हा अर्ज केला. पोलिसांनी हा दुसरा अर्जही नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा

पोलिसांनी परवानगी नाकारताना मागील वर्षीच्या आंदोलनाचा दाखला दिल्याचे सांगण्यात येत आहे. २०२५ मधील आंदोलनाच्या वेळी मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने वाहने उभी राहिल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. याशिवाय मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

गणेशोत्सवामुळे सुरक्षेचे आव्हान

मुंबईत १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांत मोठी गर्दी होत असल्याने आंदोलकांची मोठी संख्या वाढल्यास सुरक्षेचे आव्हान निर्माण होऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दक्षिण मुंबई परिसरात महत्त्वाची रुग्णालये, न्यायालये आणि शासकीय तसेच अन्य कार्यालये आहेत. मोठ्या संख्येने आंदोलक दाखल झाल्यास या भागातील वाहतूक आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यताही पोलिसांनी विचारात घेतल्याचे सांगितले जात आहे.

गणेशोत्सवानंतर आंदोलनाचा पर्याय?

मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना गणेशोत्सव संपल्यानंतर आंदोलन करण्याचा किंवा आझाद मैदानाऐवजी अन्य ठिकाणी उपोषण करण्याचा पर्याय सुचवल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, परवानगी न मिळाल्यास आपण एकट्याने मुंबईत जाऊन आझाद मैदानात उपोषण करू, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. नियोजित कार्यक्रमानुसार ते १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून १९ सप्टेंबर रोजी मुंबईत पोहोचण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जरांगे पाटील आणि प्रशासन यांच्यातील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement

.