आरक्षण द्यायचं नाही म्हणूनच दंगलखोरांना पाठींबा ? मनोज जरांगेंचं मुख्यमंत्र्यांवर आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातूनच मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना मनोज जरांगे पाटील यांनी टिका केली. यावेळी बोलताना मराठा आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून आंदोलन बदनाम करू पाहणाऱ्याना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ आहे का असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा योध्या मनोज जरांगे यांचे आरक्षण जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात आपली संवाद यात्रा सुरु केली आहे. आज ठाण्यात पोहोचलेल्या या यात्रेत मनोज जरांगे यांनी कायदा सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही लोकांना सातत्याने आवाहन करतोय. पोलीस बांधव रात्रंदिवस कायदा सुव्यवस्थेसाठी झटत आहेत. आंदोलन शांततेत पार पडावं यासाठी सर्व मराठा समाजाला सांगत आहोत. तरीदेखील तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय. सोमवारी कल्याणमध्ये तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले, मायनी, इस्लामपूर, सांगली, धाराशिव अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही आमच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले." असा थेट आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारताना मनोज जरांगे- पाटील म्हणाले कि, "हे आंदोलन रोखण्यासाठी तुम्ही काही लोकांना पुढे करत आहात असा अर्थ आम्ही काढायचा का ? राज्यातली सुव्यवस्था बिघडावी असं तुम्हाला वाटतंय का ? हा प्रश्न मला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे. तुम्ही ठरवून या लोकांना पुढे केलंय का ? आम्ही मराठे शांतता राहावी यासाठी प्रयत्न करतोय. ओबीसी-मराठा वाद निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत."असेही ते म्हणाले आहेत.
थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तुम्ही पाठबळ देताय का ? तुम्हाला जाती-जातीत तेढ निर्माण करून राज्यात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का ? आम्ही काय चूक केलीय? आम्ही तर शांततेचं आवाहन केलं आहे. तरीदेखील काही लोक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत, दंगलीची भाषा करत आहेत. मराठे- ओबीसी भाऊ आहेत. परंतु, काही लोक त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी राज्यात वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत." असेही ते म्हणाले.