मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण
मारुती चित्तमपल्ली, डॉ. विलास डांगरे, चैत्राम पवार यांना पद्मश्री, महाराष्ट्र- गोव्यातील लिबियान लोबो सरदेसाई यांचाही गौरव
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार-2025 ची घोषणा केली. सात जणांना पद्मविभूषण, 19 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार्थींमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांच्यासह नागपूरमधील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लिबियान लोबो सरदेसाई यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
कर्नाटकातील लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला असून पत्रकार-साहित्यिक ए सूर्यप्रकाश यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच अनंत नाग कला यांनाही पद्मभूषण जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तसेच पुरस्कार्थींच्या यादीत अनेक अज्ञात आणि अद्वितीय क्यक्तिमत्त्वांची नावे समाविष्ट असून कुवेतमधील योग शिक्षिका शेखा ईजे अल सबा, सफरचंद सम्राट हरिमन यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर ब्राझीलचे वेदांत गुरु जोनास मासेट यांनाही पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यू आणि कॉलीन गँटझर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोव्यातील 100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक, पश्चिम बंगालमधील ढाक वादक आणि भारताची पहिली महिला कठपुतळी कलाकार यांचा समावेश प्रतिष्ठित पुरस्कार्थींमध्ये आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लिबियान लोबो सरदेसाई यांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लोकांना एकत्र करण्यासाठी 1955 मध्ये एका जंगली भागात ‘वोझ दा लिबेरदेबे’ (स्वातंत्र्याचा आवाज) या भूमिगत रेडिओ स्टेशनची सह-स्थापना केली होती.
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेले पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. केंद्र सरकारने पद्मश्रीसाठी 30 नावे जाहीर केली आहेत. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, औषध, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्टतेला हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्कार विजेत्यांमध्ये पश्चिम बंगालमधील 57 वर्षीय ढाका वादक गोकुळ चंद्र डे यांचा समावेश आहे. त्यांनी पुरुषप्रधान क्षेत्रात 150 महिलांना प्रशिक्षण देऊन लिंगभेद मोडून काढले. डे यांनी पारंपरिक वाद्याची 1.5 किलो वजनाची हलकी आवृत्ती ‘ढाक’ तयार करत विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी पंडित रविशंकर आणि उस्ताद झाकीर हुसेन सारख्या दिग्गज कलाकारांसमवेत सादरीकरण केले आहे.
वैद्यक क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव
गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे निदान, प्रतिबंध आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील तज्ञ असलेल्या दिल्लीस्थित स्त्राrरोगतज्ञ डॉ. नीरजा भटला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. डांगरे यांची वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी ओळख आहे. गेल्या 50 वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना उपचाराअंती नवे आयुष्य प्रदान केले आहे.
भोजपूरचे सामाजिक कार्यकर्ते भीम सिंग भावेश यांना गेल्या 22 वर्षांपासून त्यांच्या ‘नई आशा’ संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्वात दुर्लक्षित गटांपैकी एक असलेल्या मुसहर समुदायाच्या उत्थानासाठी अथक परिश्रम केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 82 वर्षीय महिला सक्षमीकरणाच्या प्रखर समर्थक सायली होळकर यांनी एकेकाळी लुप्त होत चाललेल्या माहेश्वरी कलाकृतीचे रूपांतर केले आणि पारंपारिक विणकाम तंत्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी मध्य प्रदेशातील माहेश्वर येथे हातमाग शाळा स्थापन केली.
पी. दाचनमूर्ती यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते दक्षिण भारतीय संगीत आणि संस्कृतीसाठी महत्त्वाचे असलेले शास्त्राrय तालवाद्य थविलमध्ये विशेषज्ञता असलेले वाद्यवादक आहेत. त्यांना 5 दशकांहून अधिक अनुभव आहे.
यासोबतच, एल. हँगथिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते नागालँडमधील नोकलाक येथील फळ उत्पादक असून त्यांना स्थानिक नसलेल्या फळांच्या लागवडीचा 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे.
पद्मविभूषण (7)
1 दुव्वुर नागेश्वर रे•ाr ( वैद्यकीय) - तेलंगणा
2 न्यायमूर्ती (निवृत्त) श्री जगदीश सिंह खेहर (पब्लिक अफेयर्स)- चंदीगड
3 कुमुदिनी रजनीकांत लखिया - गुजरात
4 लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (कला) - कर्नाटक
5 एम. टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर) साहित्य आणि शिक्षण -केरळ
6 ओसामू सुझुकी (मरणोत्तर) व्यापार आणि उद्योग - जपान
7 शारदा सिन्हा (मरणोत्तर) कला - बिहार
पद्मभूषण (19)
ए सूर्यप्रकाश साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता - कर्नाटक
अनंत नाग - कला - कर्नाटक
विवेक देवरॉय (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण - दिल्ली
जतीन गोस्वामी - कला - आसाम
जोस चाको पेरियप्पुरम - मेडिसिन - केरळ
कैलाश नाथ दीक्षित इतर - पुरातत्व विभाग - दिल्ली
मनोहर जोशी (मरणोत्तर) - सार्वजनिक व्यवहार - महाराष्ट्र
नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी - व्यापार आणि उद्योग - तामिळनाडू
नंदामुरी बालकृष्ण - कला - आंध्रप्रदेश
पी आर श्रीजेश - स्पोर्ट्स -केरळ
पंकज पटेल - व्यापार आणि उद्योग -गुजरात
पंकज उधास (मरणोत्तर) - कला -महाराष्ट्र
रामबहादूर राय - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता -उत्तर प्रदेश
साध्वी ऋतंभरा - समाजकार्य - उत्तर प्रदेश
एस अजित कुमार- कला -तमिळनाडू
शेखर कपूर - कला -महाराष्ट्र
शोबना चंद्रकुमार - कला -तामिळनाडू
सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) - सार्वजनिक व्यवहार -बिहार
विनोद धाम - विज्ञान आणि अभियांत्रिकी - अमेरिका