दागिने लांबवणाऱ्या मन्नापूरच्या युवकाला अटक
गोकाक पोलिसांकडून कारवाई : 1 लाख 20 हजार रुपयांचे दागिने जप्त
बेळगाव : मोटारसायकलच्या टँककव्हरमध्ये ठेवलेले 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याच्या आरोपावरून गोकाक शहर पोलिसांनी मन्नापूर, ता. मुडलगी येथील एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याजवळून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. वेंकटराव मुराऱ्याप्पा देसाई (वय 35) राहणार मन्नापूर, ता. मुडलगी असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 8 ग्रॅम 700 मिलीची बोरमाळ, 14 ग्रॅम 500 मिलीचा नेकलेस असे एकूण 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशबाबू आर. बी., उपनिरीक्षक किरण मोहिते, उपनिरीक्षक निखिल कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मंटूर, ता.रायबाग येथील रेवाप्पा सत्याप्पा हळ्ळूर यांनी गोकाक येथील भगवान शेठजी यांच्या दुकानात बोरमाळ व नेकलेस गहाण ठेवले होते. 24 जानेवारी 2026 रोजी गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन ते टँककव्हरमध्ये ठेवून घरी जात होते. त्यावेळी मोटारसायकलमधील टँककव्हरमध्ये ठेवलेली दागिन्यांची पिशवी गायब झाली होती. यासंबंधी 3 फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल केला होता. याप्रकरणी वेंकटरावला अटक केली आहे.