मनमोहन सिंग पार्थिवाचा आज अंत्यविधी
अखेरच्या दर्शनासाठी नेते-कार्यकर्त्यांची रीघ : पार्थिव नेण्यात आले काँग्रेस मुख्यालयात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज शनिवारी सकाळी पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांचे पार्थिव दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले आहे. मनमोहन सिंग यांच्या कन्या शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीला पोहचणार आहेत. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेचा प्रारंभ होणार असून राजघाटानजीक त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
मनमोहन सिंग यांचे शुक्रवारी रात्री दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात निधन झाले होते. गेली साधारणत: दोन वर्षे त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. केंद्र सरकारने त्यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. काँग्रेस पक्षानेही आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम सात दिवसांसाठी स्थगित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा, काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रथम त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात नेण्यात आले. मुख्यालयात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांची रीघ लागली होती. देशाच्या अर्थकारणाला योग्य दिशा देणारे मुत्सद्दी असा नावलौकिक मनमोहन सिंग यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात मिळविला होता.
उपराष्ट्रपतींची श्रद्धांजली
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारताच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले, अशी प्रतिक्रिया त्यांच्यासह अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट, प्रतापसिंग बाजवा आणि या पक्षाच्या इतर नेत्यांनीही त्यांना शनिवारी श्रद्धांजली अर्पण केली.
अर्थव्यवस्थेचे रचनाकार
मनमोहनसिंग यांची ओळख देशाच्या अर्थव्यवस्थेचे शिल्पकार म्हणून होती. 1991 ते 1996 या काळात ते देशाचे अर्थमंत्री होते. त्यांनी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम धडाक्याने लागू केला होता. ते मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक म्हणून ओळखले जात. अर्थव्यवस्थेला जाचक नियम आणि अनावश्यक बंधनांनी जखडून ठेवले जाऊ नये. तसे केल्यास देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होणार नाही आणि देश सर्व क्षेत्रात मागे पडत जाईल, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या हाती अधिकारपद येताच त्यांनी अर्थव्यवस्थेला सरकारी पाशातून मुक्त करण्याचा प्रयत्न सातत्याने केला होता. 2004 ते 2014 या काळात ते देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होते. त्या काळातही त्यांनी आर्थिक सुधारणांची गती ठेवण्याचा प्रयत्न केला होता. या धोरणांचा देशाला लाभही झालेला आहे.
मारुती 800 वर प्रेम
अर्थमंत्री झाल्यानंतरही मनमोहन सिंग यांनी कधीही आलिशान कारचा उपयोग केला नाही. त्यांना त्यांची मारुती 800 हीच कार प्रिय होती. ते जवळच्या प्रवासासाठी याच कारचा उपयोग करीत होते. देशाचे सर्वोच्च नेते झाल्यानंतरही त्यांनी ही मारुती 800 कार आपल्या शासकीय निवासस्थानात ठेवली होती. साधेपणा हा मनमोहन सिंग यांच्या स्वभावाचा विशेष गुणधर्म होता, अशी प्रतिक्रिया त्यांच्या जीवनकाळातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. संयमित भाषा, पण दृढ निर्धार असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, याचा उल्लेख त्यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक नेत्यांनी आवर्जून केला आहे.
‘ते आमचे नेते आहेत’
मनमोहन सिंग यांच्या काळात भारताचे अमेरिकेशी संबंध दृढ होऊ लागले होते. याचा पाकिस्तानला फार राग येत असे. पाकिस्तानचे त्यावेळचे नेते नवाझ शरीफ यांची खूपच चडफड यामुळे होत असे. याच भरात त्यांनी मनमोहन सिंग यांचा उल्लेख एकदा ‘खेडवळ मित्र’ असा केला होता. तसेच मनमोहन सिंग माझ्या आणि पाकिस्तानच्या तक्रारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे करतात, असाही आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी नवाझ शरीफ यांच्यावर अनेक भारतीय नेते तुटून पडले होते. या नेत्यांमध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. ‘मनमोहन सिंग हे आमचे नेते आहेत. त्यांना बोलण्याची पाकिस्तानची लायकी नाही,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी नवाझ शरीफ यांचा समाचार घेतला होता. एका जाहीर सभेतही त्यांनी नवाझ शरीफ यांच्यावर यासंदर्भात खरपूस टीका केली होती. भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये पाकिस्तानने लक्ष घालू नये. नवाझ शरीफ यांना तो अधिकार नाही. भारत त्यांना कधीही क्षमा करणार नाही, असे त्यांनी सुनावले होते.