For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भौगोलिक संकेत प्राप्त ‘मानकुराद’

06:40 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
भौगोलिक संकेत प्राप्त ‘मानकुराद’
Advertisement

गोव्याची छोटेखानी भूमी संपूर्ण जगामध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींसाठी नावारुपाला आलेली आहे. गोव्यातल्या स्थानिक आंब्यावरती पोर्तुगीजांनी कलमे केल्याने नवीन प्रजाती निर्माण झाल्या. म्हणून आज ही भूमी मधुर रसाने युक्त अशा आंब्यासाठी प्रसिद्धीस आली. सोळाव्या शतकात गोव्यात ज्या आंब्याच्या नवीन प्रजाती निर्माण झाल्या, त्यांची चव आणि सुगंध सर्वदूर पसरला. इथल्या आंब्यांना देश-विदेशात विशेष मागणी लाभली. गोव्यात सध्या आंब्याचे दिवस असून ‘मानकुराद’ हा आंबा गोव्याचे राज्य फळ म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Advertisement

ऑगस्ट 2023 मध्ये मानकुराद आंब्याच्या प्रजातीला भौगोलिक संकेत प्राप्त झाला आणि गोव्याच्या लौकिकात मानाचा तुरा खोवला गेला. ‘मानकुराद’ या आंब्याची चव न्यारी आणि पौष्टिक गुणधर्माने युक्त असल्याने जेव्हा मानकुराद आंबा बाजारात येतो, तेव्हा त्याची किंमत जवळपास सात हजार ऊपये डझन अशी असते. एवढी किंमत झाली तरी खवय्ये मानकुरादाचा आस्वाद घेण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. गोव्यात मोन्सेरात, फर्निदाद, नीलम, पायरी, भिष्म, हिलारियो अशा आंब्याच्या विविध प्रजाती असून आज महाराष्ट्रात वेंगुर्ला, देवगड आणि रत्नागिरी ‘हापूस’ या नावाने ओळखला जाणारा आंबा मूळचा गोव्यातला ‘अल्फान्सो’ या नावाने परिचित असलेला. गोव्याचा हा आंबा वेंगुर्ल्याला गेला आणि महाराष्ट्रात हापूस व कोकणचा बापूस म्हणून नावारुपाला आलेला आहे. गोव्यात मानकुराद आंब्याच्या वैविध्यतेत काही बागायतदारांनी भर घातलेली आहे आणि त्यामुळे कार्दोज, कॉस्ता, गावस आमराल या नावाने हे आंबे ओळखले जातात. आंब्याची बागायत सेंद्रिय पद्धतीने करून इथल्या बागायतदारांनी आपल्या वृक्षावरच्या ‘मानकुराद’ला विशेष लौकिक मिळवून दिलेला आहे. दोन वर्षापूर्वी भारतीय कृषी अणुसंशोधन केंद्राने शिवोली मानकुराद आंब्याची नवीन प्रजाती शोधून नावाऊपाला आणलेली आहे. पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्याच्या भूमीत मानकुराद आंब्याचा दरवळ, त्याच्या सुगंधाने आणि चवीने निर्माण झालेला आहे. त्यामुळे पोर्तुगीज राजवटीत निर्माण झालेला त्याचा दबदबा, गोवा मुक्तीनंतरही कायम राहिलेला आहे. ‘मानकुराद’ आंब्याला भौगोलिक संकेत प्राप्त झाल्याने त्याची वैशिष्ट्यो प्रकर्षाने जगासमोर आलेली आहेत. ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो’, असे उल्लेख आंब्यासंदर्भात इथल्या लोकगीतात आढळतात. धालोत्सवाच्या मांडावरती कष्टकरी महिला ‘दारातलो आमो गे बाई तवरानी डोले गे’, असे आम्रमंजिरीला पाहून म्हणतात.

भौगोलिक संकेतांद्वारे एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता स्पष्ट होऊन व्यापार व उद्योगाला चालना मिळत असते. त्यामुळे आपल्या उत्पादित वस्तूला भौगोलिक संकेत मिळविण्यासाठी उत्पादकांची आजच्या काळात धडपड चालू असते. गोव्यात काणकोण तालुक्यातल्या खोल गावच्या मिरचीला भौगोलिक संकेत प्राप्त झालेला असून गोवा सरकारतर्फे देश-विदेशात चवीला मधुरता, पौष्टिकता आणि रसदारपणासाठी प्रसिद्धीस पावलेल्या मानकुराद आंब्याला भौगोलिक संकेत मिळविण्यासाठी चेन्नई येथील केंद्रीय कार्यालयाकडे 14 डिसेंबर 2020 रोजी गोवा राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने प्रस्ताव सादर केला होता. जेव्हा एखाद्या घटकाला भौगोलिक संकेत लाभतो तेव्हा व्यापाराच्या दृष्टीने वस्तूच्या गुणवत्तेची आणि वैशिष्ट्याची हमी मिळते. वस्तूला संरक्षण लाभल्याने कोणताही अन्य उत्पादक या समान उत्पादनाच्या वस्तू बाजारात आणून त्या नावाने विकू शकत नाही. बौद्धिक मालमत्ता अधिकाराद्वारे सदर वस्तू संरक्षित असते आणि त्याच प्रजातीच्या वस्तूची विक्री केल्यास व्यापाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करता येते. महाराष्ट्र राज्याने आजतागायत पुणेरी पगडी, पैठणी साडी, घोलवडचे चिकू, जळगावची केळी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे, कोल्हापूरचा गूळ आणि पुण्याच्या आंबेमोहर तांदळाला, पुणे येथील गणेश हिंगमीरे यांना नियोजनबद्ध ऐतिहासिक आणि विज्ञाननिष्ठ पुरावे सादर करून भौगोलिक संकेत मिळविलेले आहेत. 2008 साली त्यांनी ‘पुणेरी पगडी’ला भौगोलिक संकेत यशस्वीपणे मिळविला. महाराष्ट्राच्या तुलनेत गोवा राज्य छोटे असले तरी कृषी नैसर्गिक व  उत्पादनाची वैविध्यपूर्ण आणि समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे. गोव्याला गेल्या कित्येक शतकापासून फळांची, धान्याची, समृद्ध परंपरा लाभलेली असून त्यात आंब्यासारख्या फळाचे वैविध्य अचंबित करण्यासारखे आहे. 1563 साली गार्सिया द ऑर्तापासून 1653 मध्ये निकोलांव मानूची, 1727 मध्ये अलेक्झांडर हेमिल्टनसारख्या ज्ञानवंताने गोव्यातल्या आंब्याचे वैभव आणि गुणवत्ता स्पष्ट केलेली आहे. पुण्याच्या पेशवे दरबारात राजदूत म्हणून कार्यरत असणाऱ्या विठ्ठलराव वालावलकर यांनी कोणी सोम्या-गोम्या उठून गोव्यातल्या आंब्याची गुणवत्ता आणि महत्त्व याची दखल न घेता बाजारात त्यांची विक्री करीत असल्याबाबत सरकारला लक्ष देण्यास सांगितले होते.

Advertisement

गोव्यातल्या आंब्याच्या चवीला नवा साज देण्यात पोर्तुगीजांबरोबर आलेल्या जेजुईत पंथीयांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. देशभरात दसरी, चौसा, लंगडा अशा आंब्याच्या प्रजाती नावारुपाला आलेल्या असल्या तरी गोव्यातल्या ‘मानकुराद’ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. गोव्यातल्या अल्फान्सो आंब्याचा स्वीकार महाराष्ट्राने केला आणि त्याला जगभर लौकिक मिळवून दिलेला आहे. गोवा सरकारने इथल्या आंबे, काजू, कोकमापासून अन्य घटकांना भौगोलिक संकेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचा फायदा इथल्या शेतकरी, बागायतदारांना यशस्वीरित्या मिळू शकतो. वेंगुर्ला काजू, रत्नागिरी कोकम, सांगलीचे बेदाणे यांना भौगोलिक संकेत मिळून महाराष्ट्र राज्याने आपली घोडदौड कायम ठेवलेली आहे. आज गोव्यातल्या अल्फान्सो आंब्याचे हापूस नामकरण करून महाराष्ट्र राज्यातल्या आंबा उत्पादकाने आपली आगेकूच आंबा व्यापार क्षेत्रात प्रभावीरित्या आरंभलेली आहे. पोर्तुगीज आमदनीत गोव्यात दक्षिण अमेरिकेतून काजू, अननस, पेरू, सिताफळ यासारखी फळफळावळे आली. सत्तरीतल्या सेंद्रिय काजूगराने गुणवत्तेसह आपला दर्जा कायम राखलेला आहे. चव, माधुर्य आणि पौष्टिकता या दृष्टीने गोव्याच्या मानकुराद आंब्याचा लौकिकसुद्धा पूर्वीपासून सुप्रतिष्ठित आहे. मांडवी-म्हापसा या नद्या आणि खाड्यांच्या पाण्याने वेढलेल्या चोडण बेटाला आंब्याच्या वैभवाने ‘चुडामणी’ म्हणून नावारुपाला आणले होते. चोडण, मये येथील उत्पादकांनी रासायनिक खते, जंतुनाशके तसेच घातक घटकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने आंब्याचे संगोपन केलेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या आंब्याचा गोडवा, दरवळ शब्दापलीकडचा ठरलेला आहे. गोवा ही मूलत: शेती-बागायतींचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा लाभलेली भूमी असून गोवा मुक्तीनंतर सत्तास्थानी आलेल्या इथल्या नेत्यांनी खनिज उत्खनन, निर्यातीद्वारे राज्यातल्या नैसर्गिक संचिताची धुळधाण आरंभलेली आहे. ‘मानकुराद’ आंबा ही या भूमीची शान आहे. मानकुराद आंब्याला भौगोलिक संकेत प्राप्त झाल्याने त्याचा फायदा इथल्या बागायतदारांना जास्तीतजास्त मिळवून देणे गरजेचे आहे. ‘मानकुराद’चा गोडवा टिकविण्यासोबत त्याशी निगडित बागायतदारांना व्यापारातून जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे आवश्यक ठरणार आहे.

राजेंद्र केरकर

Advertisement
Tags :

.