मनीषा बनवालचा नवा इतिहास
वृत्तसंस्था, अॅस्टेना (कझाकस्तान)
येथे झालेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला मल्ल मनीषा बनवालाने 59 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून नवा इतिहास घडविला. मनीषाच्या या कामगिरीचे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी खास कौतुक केले आहे.
या स्पर्धेतील महिलांच्या 59 किलो वजन गटातील अंतिम सामन्यात अमेरिकेच्या अॅबीगेल निटेचा 8-6 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुवर्णपदकासाठीच्या या लढतीमध्ये प्रारंभी मनीषा 0-6 अशा गुणांनी पिछाडीवर होती. पण त्यानंतर तिने आपल्या आक्रमक डावावर सलग गुण वसूल करत अमेरिकेच्या निटेचे आव्हान संपुष्टात आणले. यापूर्वी वरिष्ठांच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या एकाही महिला मल्लाला सुवर्णपदक मिळविता आले नव्हते. 2021 साली झालेल्या या स्पर्धेत भारताच्या अनशू मलिकने रौप्यपदक पटकाविले होते.
अॅस्टेनामधील झालेल्या या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या काजल धोचक आणि निलम सिरोही यांनी आपल्या वजन गटातून प्रत्येकी 1 रौप्यपदक पटकाविले आहे. 2026 च्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण 4 पदकांची कमाई केली आहे. मनीषा बनवालने 59 किलो वजन गटात सुवर्ण, काजल धोचक आणि निलम सिरोही यांनी प्रत्येकी 1 रौप्य तर तनू शर्माने 72 किलो गटात कांस्यपदक मिळविले आहे