मनीष तिवारी हे राजकीय पर्यटक !
काँग्रेसचे नेते मनीष तिवारी हे ‘राजकीय पर्यटक’ असून प्रत्येकवेळी ते नवा मतदारसंघ निवडतात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशातील या पक्षाचे उमेदवार संजय टंडन यांनी केली आहे. 2029 च्या निवडणुकीतही ते नवा मतदारसंघ निवडतील, असा टोला त्यांनी लगावला. तिवारी 2009 मध्ये लुधियाना मतदारसंघातून निवडून आले होते. ते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्रीही होते. पण मंत्री म्हणून किंवा लुधियानाचे खासदार म्हणून ते पूर्णत: अपयशी ठरले. त्याचमुळे त्यांच्यावर लुधियाना मतदारसंघ सोडण्याची वेळ आली. अन्यथा, त्यांनी तो का सोडला असता, असा खोचक प्रश्नही टंडन यांनी केला. चंदीगढच्या जनतेला हे माहिती असल्याने येथेही तिवारी यांची डाळ शिजणार नाही. त्यांचा पराभव होणार, असे भाकितही त्यांनी केले.
टंडन हे जाणते नेते
टंडन हे भारतीय जनता पक्षाच्या चंदीगढ शाखेचे गेली 10 वर्षे अध्यक्ष आहेत. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असून ते सहा वेळा आमदार राहिलेले आणि छत्तीसगडच्या राज्यपालपद सांभाळलेले बलरामजीदास टंडन यांचे पुत्र आहेत. यावेळी चंदीगढ मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंदीगढ मतदारसंघात भारतीय जनता पक्ष निश्चितपणे हॅटट्रिक नोंदविणार आहे. तसेच देशातही पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.