मनीष सिसोदियांनी घेतली 100 कोटीची लाच
भाजपकडून गंभीर आरोप ः दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील नव्या अबकारी धोरणातील कथित भ्रष्टाचारप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर आता गंभीर आरोप झाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीचा आधार घेत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना लक्ष्य केले आहे. सिसोदिया यांनी कंपन्यांकडून 100 कोटीची लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अबकारी धोरणाचा घोटाळा उघडकीस आल्यावर आणि सीबीआय चौकशी सुरू झाल्यावर आरोपी मनीष सिसोदिया यांच्यासह 34 जणांनी 140 मोबाइल फोन बदलले आहेत. डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी हे फोन्स गायब करण्यात आल्याचा आरोप भाजप प्रवक्त्याने केला आहे.
दिल्लीतील अबकारी धोरण 5 जुलै 2021 रोजी जाहीर करण्यात आले, परंतु धोरणाची एक प्रत 31 मे 2021 रोजीच सिसोदियांच्या मित्रांना पुरविण्यात आली होती. सिसोदियांच्या या मित्रांमध्ये मद्यनिर्माते अन् पुरवठादारांचा समावेश होता. दिल्ली अबकारी धोरण घोटाळय़ाप्रकरणी ईडीने 2 व्यावसायिकांना हैदराबाद येथून अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून आता नवनवी माहिती समोर येत आहे.
दिल्ली सरकारच्या महसूलाला या घोटाळय़ामुळे 2631 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आरोपींनी 140 फोन तोडले आणि 140 नवे फोन खरेदी केले आहेत. डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी सिसोदियांनी हा प्रकार घडवून आणला आहे. याकरता आरोपींनी 1 कोटी 20 लाख रुपये खर्च केले आहेत. दोन्ही व्यावसायिक आणि त्यांच्या कंपन्यांकडून 100 कोटी रुपयांची रक्कम दिल्ली सरकारचे मंत्री आणि मनीष सिसोदियांना देण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे.
आम आदमी पक्ष हा बेईमान आणि भ्रष्ट आहे. स्वतः वॉरंटवर असणारे लोक कुणाला कसली गॅरंटी (हमी) देणार असे म्हणत पात्रा यांनी अरविंद केजरीवालांच्या दिल्ली महापालिकेसाठीच्या आश्वासनांना लक्ष्य केले आहे.