मनीष कश्यपची अखेर तुरुंगातून मुक्तता
वृत्तसंस्था/ पाटणा
तामिळनाडूमध्ये बिहारी लोकांसोबत हिंसा होत असल्याचा कथित बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आरोपी असलेला युट्यूबर मनीष कश्यपची शनिवारी तुरुंगातून सुटका झाली आहे. पाटणा उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्याने त्याच्या मुक्ततेचा मार्ग मोकळा झाला होता. पाटणा-बेउर तुरुगांत मुक्ततेसाठी आवश्यक दस्तऐवज सादर झाल्यावर शनिवारी दुपारी तो तुरुंगातून बाहेर पडला. तुरुंगाबाहेर मोठ्या संख्येत जमलेल्या समर्थकांनी त्याचे स्वागत केले.
मनीष कश्यप एका खुल्या वाहनात बसून या समर्थकांना सामोरा गेला. यादरम्यान समर्थक मनीष कश्यपशी हस्तांदोलन करण्यासाठी उत्सुक दिसून आले. मी घाबरणाऱ्यांपैकी नाही. घाबरुन मी पत्रकारिता सोडेन असे काही लोक समजत असतील तर तो त्यांचा भ्रम ठरणार आहे. मी कुणाचीच हत्या किंवा चोरी केलेली नाही, तरीही मला तुरुंगात डांबण्यात आले, तामिळनाडूच्या तुरुंगात पाठविण्यात आले, तेथे एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे मला वागविण्यात आल्याचा आरोप मनीषने तुरुंगाबाहेर समर्थकांना संबोधित करताना केला आहे.
तुरुंगातून बाहेर पडल्यावर आता मी माझ्या आईची भेट घेण्यासाठी गावी जाणार असल्याचे त्याने म्हटले. मनीष पूर्ण 9 महिन्यांनी तुरुंगातून बाहेर पडला आहे. बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपांतर्गत तामिळनाडू पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. तर त्याच्या विरोधात एनएसए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मनीष विरोधात तामिळनाडूत 6 तर बिहारमध्ये 7 गुन्हे नोंद आहेत. तामिळनाडू सरकारच्या एनएसए विरोधात मनीषने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे मनीषला दिलासा मिळाला होता.