For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूर पुन्हा हादरले, 2 जवानांना हौतात्म्य उग्रवाद्यांकडून हल्ला : आसाम रायफल्सचा ताफा ठरला लक्ष्य

11:07 PM Jul 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
मणिपूर पुन्हा हादरले  2 जवानांना हौतात्म्य उग्रवाद्यांकडून हल्ला   आसाम रायफल्सचा ताफा ठरला लक्ष्य
Represantational Image
Advertisement

►वृत्तसंस्था इंफाळ
मणिपूर पुन्हा एकदा उग्रवाद्यांच्या हिंसेमुळे हादरले आहे. सोमवारी उखरुल जिल्ह्याच्या नुंगशांग खोंग भागात उग्रवाद्यांनी आसाम रायफल्सच्या एका ताफ्यावर घात लावून भीषण गोळीबार केला. या हल्ल्यात निमलष्करी दलाचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत, तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार ही घटना दुपारी 1.30 वाजता घडली आहे.

Advertisement

आसाम रायफल्सचा ताफा पर्वतीय जिल्हा नुंगशांग खोंग क्षेत्रातून जात असताना लपून बसलेल्या उग्रवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. या गोळीबारात आसाम रायफल्सच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. यानंतर त्वरित घटनास्थळी पोहोचलेल्या अतिरिक्त सुरक्षा पथकांनी जखमी जवानांना तेथून नजीकच्या रुग्णालयात हलविले, जेथे दोन जवानांना मृत घोषित करण्यात आले, तर अन्य जखमी जवानांवर उपचार जारी आहेत.

काही जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी सुरक्षा दलांच्या जवानांना मोठ्या संख्येत तैनात करण्यात आले असून पूर्ण भागात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी ड्रोन आणि स्नायपर टीम्सना तैनात करण्यात आले आहे.

Advertisement

उग्रवाद्यांच्या या हल्ल्याची राज्याचे गृहमंत्री गोविंदास कोंथौजम यांनी कठोर निंदा केली आहे. उखरुलच्या नुंगशांग खोंगमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे अत्यंत दु:खी आहे. राज्य पूर्वीच अशांतता आणि आव्हानांना सामोरे जातेय. अशा घटना शांतता आणि सदभाव बिघडविण्याचे काम करतात. हुतात्मा जवानांच्या परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी जवान लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. या हल्ल्यासाठी जबाबदार घटकांची ओळख पटवत त्यांच्या विरोधात कायद्यानुसार कठोरातील कठोर कारवाई सुनिश्चित करू असे राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

शोधमोहीम जारी
आसाम रायफल्सने देखील या घटनेची पुष्टी देत उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगितले आहे. सध्या संबंधित भागात तणावपूर्ण शांतता आहे आणि अतिरिक्त सैन्यतुकड्यांना तैनात करण्यात आले असून उग्रवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अन्य घटनेत महिला, मुलगा जखमी
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्याच्या थिंगखोंगजांग कुकी गावात उग्रवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक महिला अन् एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ग्रामीण प्रार्थनेसाठी स्थानिक चर्चमध्ये एकत्र आले असताना हा गोळीबार झाला. उग्रवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांद्वारे बेछूट गोळीबार केला आणि गावात बॉम्ब फेकले होते. तेथून पसार होण्यापूर्वी उग्रवाद्यांनी अनेक घरांना पेटवून दिले.

Advertisement
Tags :

.