मणिपूर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
विरोधी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटची मागणी
वृत्तसंस्था/गुवाहाटी
मणिपूरमधील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत बिघडली असून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मिझोराममधील विरोधी पक्ष असणाऱ्या मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाने केली आहे. मणिपूरमधील परिस्थितीचे पडसाद ईशान्य भारतातील अन्य राज्यांमध्येही उमटत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशातील शांतता धोक्यात आली आहे. अशा स्थितीत मणिपूरमध्ये आता नव्या नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रतिपादन केले आहे. आपल्या राज्यातील वांशिक संघर्षावर तोडगा काढण्यात बिरेन सिंग यांना सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे मैतेयी आणि कुकी समाज एकमेकांकडे शत्रुत्वाच्या भावनेने पहात आहेत. सातत्याने या दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष होत असून निरपराध माणसांचे बळी पडत आहेत. सशस्त्र गुंडांचा प्रभाव वाढला आहे. कायदा-सुव्यवस्था परिस्थिती दयनीय पातळीवर पोहचली असून या स्थितीला मुख्यमंत्री उत्तरदायी आहेत. त्यांनी नैतिक उत्तरदायित्व स्वीकारुन आपल्या पदाचा त्याग करावा आणि कोंडी फोडावी, असे आवाहन या पक्षाने केले आहे.