मणिपूर, छत्तीसगड उपांत्यपूर्व फेरीच्या समीप
वृत्तसंस्था, रायपूर (छत्तीसगड)
येथे सुरू असलेल्या 2026 च्या स्वामी विवेकानंद चषक 20 वर्षांखालील वयोगटातील पुरूषांच्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत मणिपूर आणि छत्तीसगड यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या समीप वाटचाल केली आहे. तसेच कर्नाटकचा संघाही उपांत्यपूर्व फेरीच्या उंबरठ्यावर आहे.
ब गटातील झालेल्या सामन्यात मणिपूरने दादरा-नगर हवेली दमन-दिव संघाचा 7-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे ब गटात आता मणिपूरने आघाडीचे स्थान मिळविले आहे. इ गटातील झालेला नागालँड आणि छत्तीसगड यांच्यातील सामना बरोबरीत राहिला. सदर स्पर्धा येथील रामकृष्ण मिशन आश्रमच्या मैदानावर खेळविली जात आहे.
मणिपूर आणि दादरा-नगर हवेली यांच्यातील सामन्यात मणिपूर संघातील सलाम मेताईने पूर्वार्धातच शानदार हॅट्ट्रीक साधली. तर चानम आकाश मेताई तसेच एस. गुइथोबा, वाहेंगबाम जॅक सिंग आणि के. कार्लोस सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. ब गटातील अन्य एका सामन्यात नागालँडने यजमान छत्तीसगडला 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात छत्तीसगडतर्फे इंद्रजित रॉयने तर नागालँडतर्फे अचुमीने प्रत्येकी 1 गोल केला. ब गटात आता मणिपूरचा संघ दोन सामन्यांतून 6 गुणांसह अग्रस्थानावर आहे. तर छत्तीसगडचा संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता या दोन संघात ब गटातील लढत बुधवारी होणार आहे. मणिपूरचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. तर यजमान छत्तीसगडला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी शेवटच्या सामन्यात विजय मिळविणे जरुरीचे आहे.
इ गटातील सामन्यात कर्नाटकाने ओडिशाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत कर्नाटकाने ओडीशावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. जॉन्स्टर मॅरेकने कर्नाटकाचे खाते उघडले. त्यानंतर रोनिक माझीने ओडिशाला बरोबरी साधून दिली. टी. प्रेमीशने कर्नाटकाचा दुसरा गोल केला. मेत्राम सिंग आणि निरुपम गौडा यांनी कर्नाटकातर्फे प्रत्येकी 1 गोल नोंदविला. शेवटच्या दोन मिनिटांच्या कालावधीत ओडिशाचा दुसरा गोल पंकजने केला. कर्नाटकाने इ गटातून दोन सामन्यांतून 3 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. तर या गटात पश्चिम बंगालच्या संघाने तीन गुण मिळविले असून त्यांचा एक सामना बाकी आहे