मणिपूर कारवाई : सुरक्षा दलांना स्वातंत्र्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांनी आवश्यक ती कारवाई करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. सुरक्षा दलांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जे करण्याची आवश्यकता आहे, ते करण्याचे स्वातंत्र्य या आदेशामुळे मिळाले आहे, असे तज्ञांचे मत आहे. नुकताच काही भागांमध्ये पुन्हा ‘आफ्स्पा’ हा कठोर कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेतला गेला असून या राज्यातील परिस्थिती नाजूक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
राज्यातील सेकमाई, लामलाई, जिरीबाम, लेमाखोंग आणि मोईरांग या पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा आफ्स्पा लागू करण्यात आला आहे. याशिवाय इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व आदी भागांमध्ये कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून या राज्यात जातीय संघर्ष होत असून अनेकांचे प्राण गेले आहेत. राज्यासरकार आणि केंद्र सरकार कायदा सुव्यवस्था स्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून प्रत्येक भागाचा आढावा घेतला जात आहे.
आतापर्यंत 200 ठार
राज्यात होत असलेल्या जातीय संघर्षात आतार्यंत 200 लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. मुख्य संघर्ष मैतेयी आणि कुकी या जमातींमध्ये होत आहे. इतर अनेक जनजातीही या संघर्षामध्ये समाविष्ट असून आता स्थिती सौम्य होत असली तरी तणाव आहे. जातीय हिंसाचार आता काही प्रमाणात थांबला असून राज्याच्या काही भागात शांतता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या राखीव दलांच्या वाढीव तुकड्या काही भागांमध्ये नियुक्त केल्या गेल्या असून हिंसाचार नियंत्रणात आला आहे.
बराक नदीत सापडले मृतदेह
एक महिला आणि दोन बालके यांचे मृतदेह मणिपूरमधून वाहणाऱ्या बराक नदीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या सहा नागरीकांपैकी तिघांचे हे मृतदेह असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 11 नोव्हेंबरला सुरक्षा रक्षकांनी हमार संघटनेच्या 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर जिरीबाम भागात तणाव निर्माण झाला होता. नागरीकांना संरक्षण देण्यासाठी शिबीरांची स्थापना करण्यात आली होती. याच शिबीरातून सहा लोक बेपत्ता झाले होते. नदीत सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटविण्यात येत आहे.