मणिपाल हेल्थचा समभाग 11 टक्के प्रिमीयमसह सुचीबद्ध
वृत्तसंस्था/मुंबई
देशात हॉस्पिटलचे जाळे असणाऱ्या मणिपाल हेल्थचा समभाग बुधवारी शेअरबाजारात 11 टक्के प्रिमीयमसह सुचीबद्ध झाला आहे. या आयपीओला गुंतवणूकदारांचा मिळताजुळता प्रतिसाद मिळाला होता. कंपनी या आयपीओतून 9275 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओची इशु किमत 590 रुपये प्रति समभाग अशी होती. या तुलनेत कंपनीचा समभाग बीएसईवर 655 रुपये व एनएसईवर 652 रुपयांवर खुला झाला होता. आयपीओतून सुचीबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांना 11 टक्के इतका परतावा समभागाने दिल्याचे पहायला मिळाले. नंतर समभाग मात्र 634 रुपयांवर खाली आला होता आणि पुन्हा नंतर वाढत 676 रुपयांपर्यंत समभागाने मजल मारली होती. पण दिवसअखेर मात्र समभाग 666 रुपयांवर बंद होताना दिसला.
किती मिळाला परतावा
गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशी कंपनीच्या समभागाने 13 टक्के इतका परतावा दिला. यामध्ये पाहता कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अधिक फायदा झाला होता. कारण त्यांना 56 रुपये प्रत्येकी प्रमाणे समभाग मिळाले होते. आयपीओ 29 जुलै ते 31 जुलैपर्यंत गुंतवणूकीसाठी खुला होता. एकंदर आयपीओ 5.12 पट सबस्क्राइब झाला. यात आयपीओ पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांनी 8.54 पट, बिगर संस्थात्मक खरेदीदारांनी 1.06 पट सबस्क्राइब केला होता.
रक्कमेचे काय करणार
या आयपीओअंतर्गत 8 हजार कोटींचे ताजे समभाग सादर करण्यात आले आहेत. याशिवाय काही समभाग हे ऑफर फॉर सेलअंतर्गत विक्री करण्यात आले आहेत. ऑफर फॉर सेलमधली रक्कम ही समभाग विक्री करणाऱ्या समभागधारकांना मिळाली आहे. तर नव्या समभागांच्या विक्रीतून उभारलेली रक्कम कर्जाचा भार कमी करण्यासोबत इतर कारणांसाठी खर्च केली जाणार आहे.