For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : मनिकर्णिका कुंडाच्या कामाची स्थिती, 9 महिन्यात 45 टक्केच दगडकाम

02:03 PM May 04, 2025 IST | Snehal Patil
kolhapur   मनिकर्णिका कुंडाच्या कामाची स्थिती  9 महिन्यात 45 टक्केच दगडकाम
Advertisement

जून महिन्यात काम पूर्ण करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ठेकेदार ओसवाल कंस्ट्रक्शनला सुचना

Advertisement

By : संग्राम काटकर

कोल्हापूर : प्राचीन काळातील भक्कम आणि शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना राहिलेला अंबाबाई मंदिर घाटी दरवाजाजवळील मनिकर्णिका कुंडाच्या नुतनीकरणासाठी केले जात असलेले दगड घडवण्याचे काम संथ गतीने सुरु आहे. 9 महिन्यात दगड काम 40 ते 45 टक्केच झालेले आहे. अद्यापही कुंडाभोवतीची संरक्षण भींत, अंबाबाई मंदिरबाजूला पाच कमानी यासह विविध प्रकारचे दगडी काम करणे बाकी आहे.

Advertisement

अशातच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कुंडाच्या दगड कामात लक्ष घातले आहे. त्यांनी येत्या जून महिन्यापर्यंत नुतनीकरणाचे काम पूर्ण करण्याची सुचना केल्याने नुतनीकरणाचे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी ठेकेदार ओसवाल कंस्ट्रक्शनला तासंतास कामात गुंतावे लागणार आहे.

भारतात मणिकर्णिका नावाने दोन कुंड आहेत. एक कुंड काशी येथे व दुसरे अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळ आहे. घाटी दरवाजाजवळील कुंडाचा करवीर महात्म्यामध्ये उल्लेख आहे. हे कुंड काही कारणास्तव 1957 साली बुजवले. कुंडाच्या जागेवर काही वर्षांपूर्वी महापालिकेने स्वच्छतागृह बांधले होते. देवीच्या दारात स्वच्छतागृह हे न पटल्याने 2016 साली हिंदूत्ववाद्यांनी मंदिर आवारात घसून स्वच्छतागृहच पाडले.

देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी तर 2020 साली कुंड खुले करण्याला सुरुवात केली. यानंतर समितीने केलेल्या पाठपुराव्या सकारात्मक घेत गतवर्षी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच कुंड नुतनीकरणाला शासनाच्या विधी व न्याय विभागाने परवानगी दिली. साताऱ्यातील ओसवाल कंस्ट्रक्शनकडे नुतणीकरणाचा ठेकासुद्धा दिला. देवस्थान समितीने नुतणीकरण कामासाठी 5 कोटी रुपये निधी देण्याची तयारी दर्शवली.

कंस्ट्रक्शनने गतवर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान कुंड नुतनीकरण सुरु केले. त्यासाठी नांदेडहून टप्प्या-टप्प्याने 90 टन दगड आला. बॅल्ब बेसाल्ट प्रकारातील हा दगड आहे. टेंबलाई टेकडीवरील मोकळ्या जागेत कुंडासाठी दगड घडवण्याला सुरुवात केली. मात्र गेल्या आठ महिन्यात घडवलेल्या दगडांपासून कुंडातील तुटलेल्या चौकोनी पायऱ्यांचेच काम पूर्ण केले आहे. काम कसे सुरु आहे, याची माहिती देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे घेत आहेत. त्यांनी कुंड नुतनीकरण कामात लक्ष घातले आहे.

येत्या जून महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्याची सुचना कुंडाचे काम करत असलेल्या ठेकेदार ओसवाल कंस्ट्रक्शनला केली आहे. जिल्हाधिकारी यांनी भलेही सुचना केली असली तरी अद्यापही दगडांपासून कुंडाच्या पूर्व, दक्षिण, व उत्तर दिशेला उभ्या करण्यात येणाऱ्या संरक्षक भिंती तयार करायच्या बाकी आहेत. कुंडाच्या दक्षिण बाजूला मोठ्या 5 मोठ्या दगडी कमानीही उभारण्यात येणार आहेत. परंतू अद्यापही कमानी घडवलेल्या नाहीत.

कुंडाच्या वरील बाजूला आतमध्ये जाता येईल, अशा पाच ओवऱ्याही केल्या जाणार आहेत. परंतु या ओवऱ्याही तयार करणे बाकी आहे. अंबाबाई मंदिर आवारात जशा ओवऱ्या आहेत, अगदी तशाच ओवऱ्या दगड कामातून साकारल्या जाणार आहेत. ओवऱ्यांना नक्षीदार कमानी केल्या जाणार आहेत. कमानी साकारण्यासाठी अलीकडेच दगड आणला आहे. नक्षीकाम करणे सोपे जाईल, अशा पद्धतीचा दगड असल्याचे ओसवाल कंस्ट्रक्शन सांगत आहे.

कुंड नुतनीकरणावर कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांवर आहे. परंतु अधिकारी कामाकडे फारसे लक्ष देत नसल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांना समजली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना कुंडाच्या कामावरील दुर्लक्षावऊन झापल्याची माहिती आहे.

कुंड कामाकडे जिल्हाधिकारीच बघणार असतील तर ठेकेदार ओसवाल कंस्ट्रक्शनला लवकर आणि दर्जेदार काम करावे लागणार आहे. कुंडाच्या कामात हयगय झाली तर तीही खपवून घेणार नाही, असेही देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे.

असा आहे मनिकर्णिका कुंड

  • चौकोनी 60 फुट बाय 60 फुट आकार
  • अंदाजे 11 मीटर खोल
  • मंदिर प्रकारातील बारव सौंदर्यशिल्पाचा एक प्राचिन ठेवा म्हणून कुंडाकडे पाहतात

"मनिकर्णिका कुंडाचे दगड काम करण्याला वेळ लागणार आहे. नेमकेपणाने दगडकाम करावे लागत आहे. दगड कामात चुक होणार नाही याचीही दक्षता घेतली आहे. टेंबलाई टेकडीवर सध्या 10 कर्मचारी कुंडातील ओवऱ्या, कमानी, संरक्षण भिंती दगडामध्ये घडण्याचे काम करत आहेत. जिल्हाधिकारी यांनी सांगितल्यानुसार जून महिन्यात कुंडाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने जोरदार परीश्रम घेतले आहेत."

  • दशरथ देसाई (प्रतिनिधी : ओसवाल कंस्ट्रक्शन)
Advertisement
Tags :

.