मनिका, श्रीजा यांची विजयी सलामी
वृत्तसंस्था / मॅकॉव (चीन)
येथे सोमवारपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या विश्व चषक टेटे स्पर्धेत भारताच्या मनिका बात्रा आणि श्रीजा अकुला यांनी विजयी सलामी दिली.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या 30 व्या मानांकीत मनिका बात्राने न्यू कॅलेडोनीयाच्या मेलीस गिरेटचा 11-1, 11-2, 11-6, 11-4 अशा 4-0 सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या 34 व्या मानांकित श्रीजा अकुलाने ऑस्ट्रेलियाच्या 68 व्या मानांकीत पेसीहोगीओसचा 11-9, 11-4, 11-8, 6-11 अशा 3-1 सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. सदर स्पर्धा दोन टप्प्यात खेळविली जात असून ती प्राथमिक गट आणि त्यानंतर बादफेरी होईल.
या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन स्वतंत्र गटामध्ये खेळविली जात आहे. विविध देशांचे स्पर्धक 16 गटामध्ये विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटात तीन खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत मनिका बात्रा आणि श्रीजा अकुला हे भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.